पहिल्या टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून न्यूझीलंड पराभूत, दोन डेब्यू करणारे ठरले विजयाचे शिल्पकार

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला आहे. त्यामध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जात असून पहिला सामना आज (१५ मार्च) खेळला गेला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केशव महाराज करत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ते संघर्ष करताना दिसले, कारण १४.३ षटकात ९१ धावसंख्या उभारतच संपूर्ण संघ बाद झाला. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा जिमी नीशमने केल्या. त्याने २१ चेंडूत २६ धावा केल्या. तसेच सॅंटनरने १५ धावा (१९ चेंडू) आणि कोल मॅककोन्चीने १५ धावा (११ चेंडू) केल्याने काही समाधानकारक धावसंख्या उभारता आली. यावेळी न्यूझीलंडचे सात खेळाडू एकेरी धावावर बाद झाले.

दक्षिण आफ्रिकेकडून नकोबानी मोकोएनाने पदार्पण केले. या १९ वर्षीय वेगवान गोलंदाजाने पहिल्याच सामन्यात ३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने ३.३ षटकात २६ धावा देत नीशम, मॅककोन्ची आणि झॅकरी फॉक्स यांना बाद केले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या महाराज, जेराल्ड कोटत्झी आणि ओटनील बार्टमन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर-विकेटकीपर कॉनर एस्टरहुइझेनने नाबाद ४५ धावा केल्या. त्याने ४८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारले. २४ वर्षाच्या कॉनरचा हा पदार्पणाचा सामना होता. तसेच डियान फॉरेस्टरने नाबाद १६ धावा केल्या आणि त्याचाही आता पदार्पणाचा टी२० सामना होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने १६.४ षटकात ९३ धावांचे लक्ष्य गाठले.

मोकोएना प्लेयर ऑफ द मॅच ठरला. आता या मालिकेतील दुसरा सामना १७ मार्चला खेळला जाणार आहे.

Comments are closed.