टी20 वर्ल्डकप सामन्यांनंतर क्रमवारीत मोठा बदल! ईशान किशनला फायदा, मात्र अभिषेक शर्माचे नुकसान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) बुधवारी (२५ फेब्रुवारी) पुरुष संघांची टी२० क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारताचा सलामीवीर ईशान किशनने पुन्हा एकदा या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याने तीन स्थानांची झेप घेतली असून तो आता अभिषेक शर्मासोबत पहिल्या पाचमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा लयीत असलेला फलंदाज साहिबजादा फरहानलाही दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर त्यामुळे अभिषेकला धोका निर्माण झाला आहे.

अभिषेकचा फॉर्म या टी२० विश्वचषकात हरवला असल्याचे दिसते, यामुळे त्याचा त्याच्या रेटींगवर परिणाम झाला आहे. तो अव्वल स्थानावर असला तरी त्याची रेटींग ८९१ वरून ८७७ अशी झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने पहिल्या दहामध्ये प्रवेश केला आहे. त्याने १० स्थानांची झेप घेत ९व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणारा इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने १० स्थांनानी झेप घेत १८वा क्रमांक गाठला आहे.

आयसीसी टी२० गोलंदाजी क्रमवारीत भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती पहिल्या स्थानावर कायम आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. तो आता ८व्या स्थानावर आला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशला तर थेट २१ स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने ३रे स्थान गाठले आहे.

भारतासाठी एक धोक्याची बातमी आहे. अष्टपैलू क्रमवारीमध्येही मोठा बदल झाला आहे. त्याचा धोका मात्र भारताला आहे. या क्रमवारीत झिम्बाब्वेचा कर्णधार सिंकदर रझा पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर आला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा सईम आयुब दुसऱ्या स्थानावर गेला आहे. या क्रमवारीत भारताचा हार्दिक पांड्या तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

या स्पर्धेत भारताचा पुढील सुपर-८ सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना २६ फेब्रुवारीला चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले सुपर-८चे सामने गमावल्याने चेन्नईमध्ये होणारा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.