चंद्रपुरात सहा वर्षांच्या चिमुकल्याने खेळता खेळता गिळले लोहचुंबक; विनाशस्त्रक्रिया एंडोस्कोपीद्वारे बाहेर काढण्यात यश
लहान मुलांच्या हातात खेळणी देताना पालकांनी सतर्क राहण्याची गरज असते. चंद्रपुरात सहा वर्षांच्या एका चिमुकल्याने खेळता खेळता चुकून लोहचुंबक गिळले. चंद्रपुरातील गॅस्टोएन्टेरॉलॉजी पोट, लिव्हर, एन्डोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर राहुल सैनानी यांनी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता, दुर्बिणीच्या साह्याने अत्यंत शिताफीने हे लोहचुंबक बाहेर काढून चिमुकल्याला जीवदान दिले आहे.
चंद्रपुरातील सहा वर्षीय मुलगा घरात लोहचुंबकाशी खेळत होता. त्यावेळी त्याचे आई-वडील जवळ नव्हते. खेळता खेळता त्याने ते लोहचुंबक तोंडात टाकले आणि ते थेट पोटात गेले. मुलगा रडत काही पोटात गेल्याचे पालकांना सांगितले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्याला तातडीने चंद्रपुरातील डॉक्टर राहुल सैनानी यांच्याकडे नेण्यात आले. मुलाने घटनेच्या काही वेळ आधीच जेवण केले होते. अशा परिस्थितीत भूल देणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होते. मुलाची गंभीर स्थिती पाहता, डॉक्टरांनी वेळ न घालवता ‘एंडोस्कोपी’ करण्याचा निर्णय घेतला. कोणतीही चिरफाड न करता आणि भूल न देता, केवळ २ मिनिटांच्या आत दुर्बिणीच्या मदतीने ते लोहचुंबक पोटातून बाहेर काढण्यात आले. यामुळे मुलाला होणारा मोठा त्रास आणि संभाव्य शस्त्रक्रिया टळली. डॉक्टरांनी कौशल्याने लोहचुंबक बाहेर काढत चिमुकल्याला जीवदान दिले आहे. त्यामुळे डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
Comments are closed.