प्रभारी उद्यान अधीक्षक निलंबित; सहा अभियंत्यांना दोन हजारांचा दंड; कर्तव्यात कसूर; सांगली मनपाची कारवाई

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूरपणा केल्याने प्रभारी उद्यान अधीक्षक डॉ. रवींद्र ताटे यांना मनपाच्या सेवेतून तीन महिन्यांसाठी निलंबित केले, तर अनधिकृत बांधकामे रोखण्यास हलगर्जीपणा केल्याने सहा अभियंत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले. तर, मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतची ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
पारदर्शी व गतिमान प्रशासन होण्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्या आहेत. काहींच्या बदल्यादेखील केल्या आहेत. आता आयुक्तांनी कामचुकार व कर्तत्वात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. घनकचरा व्यवस्थापनाबाबत डॉ. रवींद्र ताटे यांचे काम समाधानकारक नसल्याने आयुक्तांनी त्यांच्याकडून आरोग्य अधिकारीपदाचा पदभार काढून घेतला. त्यांच्याकडे उद्यान अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. उद्यान विभागाकडील देखभालीसाठी दैनंदिन फिरती करून कामकाजाबाबतचे फोटो ग्रुपवर शेअर करणे व झाडांचे मंथन करण्याबाबत सूचना देऊनही डॉ. ताटे यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यांची वर्तणूक गंभीर स्वरूपाची, नियमबाह्य व शिस्तभंगाची असल्याने त्यांना तीन महिन्यांसाठी महापालिका सेवेतून निलंबिल केले.
तसेच महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी बांधकामांची दैनंदिन पाहणी करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश नगररचना विभागाकडील शाखा अभियंत्यांना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला होता. मात्र, या आदेशाचे पालन न करता, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
यातील कोरे वगळता अन्य अभियंता मानधनतत्त्वावर पालिकेच्या सेवेत आहेत. तसेच महापालिकेचे प्रभारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतची ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी याबाबतचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले होते. या धडाकेबाज कारवाईमुळे अधिकारी वर्गात खळबळ माजली आहे.
Comments are closed.