हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये अधिकृत चर्चा सुरू होणार? कोलंबो, बँकॉकमधील ‘ट्रॅक 2’ बैठकीतून सकारात्मक संकेत
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील अधिकृत चर्चा थांबली आहे. मात्र, दोन्ही देशांमध्ये अनौपचारिक म्हणजे ट्रॅक 2 बैठका कोलंबो आणि बँकॉक येथे झाल्याचे वृत्त आहे. या ट्रॅक 2 बैठका सकारात्मक झाल्या असल्याने दोन्ही देशात अधिकृत आणि औपचारिक म्हणजे ट्रॅक 1 चर्चा सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच झाल्यास दोन्ही देशातील तणाव कमी होण्यास मदत होणार आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील औपचारिक सरकारी स्तरावरील चर्चा थांबली आहे. मात्र, दोन्ही देशात ‘ट्रॅक २’ राजनैतिकता म्हणजे दोन्ही देशांमधील अनौपचारिक चर्चा होत आहेत. अशा चर्चांसाठी दोन्ही देशांचे अधिकारी आतापर्यंत किमान तीन ते चार वेळा भेटल्याचे वृत्त आहे. या आठवड्यात कोलंबो आणि बँकॉक येथे हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींच्या बैठका झाल्याचे समजते. या बैठकीत दोन्ही देशांचे निवृत्त लष्करी अधिकारी आणि माजी राजनैतिक अधिकारी सहभागी झाले होते. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमध्ये अनेकदा ‘ट्रॅक टू’ चर्चा झाली आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींमध्ये या आठवड्यात ‘ट्रॅक टू’ राजनैतिक चर्चेची नवीन फेरी सुरू झाली. वृत्तानुसार, या बैठका कोलंबो आणि बँकॉक येथे झाल्या. तणावाच्या काळात संवाद माध्यमे मजबूत करणे आणि संभाव्य संघर्ष रोखण्यासाठी व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना विकसित करणे, हा या बैठकांचा मुख्य उद्देश होता. या बैठकांदरम्यान, दोन्ही बाजूंनी माहितीची देवाणघेवाण केली आणि दहशतवाद व पाण्याशी संबंधित मुद्द्यांवर मोकळपणाने चर्चा झाली.
‘वायॉन’च्या वृत्तानुसार, दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या चर्चेतील माहिती आणि सूचना औपचारिक ‘ट्रॅक वन’ माध्यमांद्वारे प्रसारित करण्याच्या मार्गांवरही विचार केला. ‘ट्रॅक वन’ चर्चेमध्ये दोन्ही देशांच्या विद्यमान सरकारी अधिकाऱ्यांमध्ये थेट संवाद होतो.
निवृत्त लष्करी अधिकारी, राजनैतिक अधिकारी, माध्यम प्रतिनिधी आणि अभ्यासक संभाव्य संघर्ष कमी करण्यासाठी व्यवस्थापित करण्यासाठी ‘ट्रॅक २’ स्तरावर भेटत आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या संघर्षानंतर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील अधिकृत चर्चा थांबली असताना परस्पर संवादासाठी ट्रॅक 2 बैठका घेण्यात येत आहेत. या चर्चेचे अहवाल दोन्ही देशांच्या सरकारांनाही सादर केले जातात.
बँकॉक आणि कोलंबो येथे झालेली अलीकडील बैठक दोन्ही देशांमधील संकटांचा सामना करण्यासाठी आणि संवाद स्थापन करण्यावर केंद्रित होती. लहान समस्यांचे मोठ्या संघर्षात रूपांतर रोखण्यासाठी प्रतिनिधींनी व्यावहारिक उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच, तणाव अचानक वाढल्यास त्याचे शांतपणे व्यवस्थापन कसे करावे, यावरही त्यांनी विचारमंथन केले, असे ‘WION’ च्या अहवालात म्हटले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील अधिकृत संवाद सध्या थांबलेला असला, तरी या अनौपचारिक बैठकांवरून संवादाचे मार्ग खुले ठेवण्यात दोन्ही देशांनी उत्सुकता दाखवली आहे.
Comments are closed.