बारावीत रायगड टॉपर; मुलीच सुपर

पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत रायगड जिल्हा टॉपर असून तेथील मुलीच सुपर ठरल्या आहेत. रायगडने उज्ज्वल यशाची परंपरा यावर्षीही कायम ठेवत 94.66 टक्के विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. ठाणे जिल्ह्याचा निकाल 93.74 टक्के लागला तर पालघर जिल्ह्यातील 92.19 टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. भविष्याच्या वाटचालीला दिशा देणारा बारावीचा निकाल जाहीर होताच हजारो विद्यार्थ्यांनी हिप हिप हुर्रेऽऽ म्हणत आपला आनंद व्यक्त केला. तसेच एकमेकांना पेढा भरवून तोंड गोड केले. बारावी निकालाच्या सेलिब्रेशनचे फोटो समाजमाध्यमांवरदेखील झळकले. आज दिवसभर घरोघरी चर्चा होती ती फक्त बारावीच्या निकालाचीच.

यावर्षीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करीत मुंबई रायगड विभागामध्ये यशाचे शिखर सर केले आहे. सर्वाधिक 94.66 टक्के एवढा निकाल लागला असून या विभागात 29 हजार 493 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी 29 हजार 417 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील 27 हजार 884 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 1 हजार 569 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून त्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या वर्षी रायगडचा निकाल 94.83 टक्के एवढा लागला होता. यंदा हा निकाल 0.17 टक्क्यांनी घसरला आहे. निकालाच्या तुलनेत रायगडातील मुलींनी ‘हम किसी से कम नहीं’ म्हणत उज्ज्वल यश संपादन केले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

आदिवासीबहुल जिल्हा अशी ओळख असलेल्या पालघर जिल्ह्यातील पालघर विद्यार्थ्यांनीदेखील चांगले यश मिळवले असून 92.19 टक्के एवढा निकाल लागला आहे. एकूण 43 हजार 729 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पालघरमध्ये 50 हजार 670 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या 21 हजार 793 एवढी असून उत्तीर्ण मुलांची संख्या 24 हजार 936 आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, विक्रमगड या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीदेखील बारावीच्या परीक्षेत अनेक अडचणींवर मात करून चांगले यश मिळवले आहे. गेल्या वर्षी पालघर जिल्ह्याचा निकाल 93.51 टक्के एवढा लागला होता. यंदा मात्र तो काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.

यंदाच्या बारावी परीक्षेत ठाणे जिल्ह्यातून 96 हजार 89 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 89 हजार 827 उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल 93.74 टक्के एवढा लागला. यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्य असे की गेल्या वर्षीपेक्षा यंदा टक्केवारी वाढली आहे. 2024 च्या परीक्षेत ठाणे जिल्ह्याची टक्केवारी 92.08 टक्के एवढी होती, ती यावर्षी 1.66 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचा आनंद आज ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा निकाल सर्वाधिक 95.94 टक्के एवढा लागला आहे. बारावीमध्ये चांगले यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कौतुक केले आहे.

नवी मुंबई आघाडीवर
पनवेल 96.03, उरण 93.85, कर्जत 96.38, खालापूर- 90.48, सुधागड- 85.33, पेण- 92.99, अलिबाग 95.56, मुरुड- 90.69, रोहा-95.29, माणगाव- 96.06, तळा- 99.48, श्रीवर्धन- 84.09, म्हसळा 96.62, महाड- 96.14, पोलादपूर- 91.16. रायगडात तळा तालुका टॉपर आहे.

मोखाड्याची बाजी
वाडा- 91.82, मोखाडा 96.44, विक्रमगड 87.79, जव्हार 86.92, तलासरी – 95.72, डहाणू 81.13, पालघर- 90.99, वसई 93.83. पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुका टक्केवारीत सरस ठरला आहे.

कल्याण ग्रामीण – 94.34, अंबरनाथ 93.55, भिवंडी 92.25, मुरबाड 88.00, शहापूर – 93.57, ठाणे महापालिका क्षेत्र 95.41, नवी मुंबई महापालिका क्षेत्र 95.94, मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्र 95.30, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र 92.51, उल्हासनगर महापालिका क्षेत्र 90.75, भिवंडी महापालिका क्षेत्र – 92.11. ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे

Comments are closed.