माल आला का! कार्य झाले का!! प्रचारात ‘कोडवर्ड’चा बोलबाला

पुणे जिल्ह्यातील बारामती वगळता 13 नगरपरिषद व तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आज सुपर संडे उमेदवारांना मिळाला. घरोघरी भेटीगाठी, रॅली यावर उमेदवारांनी भर दिला; परंतु त्यापेक्षाही साप्ताहिक सुट्टी असल्याने छोटी शहरे असलेल्या या गावांमध्ये उमेदवारांनी मतदारांना घरच्या घरी गाठण्यासाठी सर्व यंत्रणा राबवली. “माल आला का?”, “कार्य झाले का?” अशा ‘कोडवर्ड’ची भाषा प्रचारक कार्यकर्त्यांमध्ये ऐकू येत आहे.

नगरपरिषदांच्या या वेळच्या निवडणुका रॅली, शक्तीप्रदर्शन यापेक्षा प्रत्यक्ष भेटीगाठींवर केंद्रित झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, माळेगाव, दौंड, शिरूर, जेजुरी, सासवड, भोर, फुरसुंगी, चाकण, लोणावळा, तळेगाव, आळंदी, राजगुरूनगर, मंचर, जुन्नर या नगरपरिषदांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील प्रचारापेक्षा खर्च किती करणार किंवा किती झाला याची चर्चा उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांमध्येही जाहीरपणे होत आहे. कार्यकर्तेदेखील आपल्या उमेदवाराचे बजेट किती आणि वाटप कितीचे होणार हे उघडपणे सांगत आहेत. जेवणावळी, जेवणाच्या कुपनांपेक्षा पाकिटाला महत्त्व आले आहे.

विशेष म्हणजे निवडणुकीतील भ्रष्टाचारावर रुबाबात बोलणारे, उच्चभ्रू सुशिक्षितपणाचा आव आणणारे मात्र हळूच पाकीट स्वीकारतात, याचे किस्से कार्यकर्ते आणि उमेदवार एकमेकांना सांगताना दिसतात. मतांसाठी जवळपास सर्वच प्रमुख उमेदवारांकडून पाकिटे घेतली जातात. अशा वेळी मत नक्की आपल्यालाच मिळेल का याची खात्री नसते; परंतु समोरच्यापेक्षा आपण मोठे पाकीट दिले, त्यामुळे मत आपल्यालाच मिळणार, अशी खात्री उमेदवार बाळगून आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे विश्वासू व्यक्तींची नेमणूक केली जात आहे. निवडणुकीतील पैसेवाटपाला बारामतीदेखील अपवाद नाही. बारामतीतील पैसेवाटपाची जाहीर चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

वाटप चालू, पण सापडत कोणीच नाही

सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. सगळेच सत्ताधारी असल्यामुळे आर्थिक रसद मोठ्या प्रमाणात मिळाली आहे. त्यामुळे पाकिटे, वाटप, कार्य, माल या शब्दांची रेलचेल त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. निवडणूक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर होत असताना, चेकपोस्टवर पैसे पकडण्याची एकही तक्रार किंवा घटना घडलेली नाही, हे विशेष.

Comments are closed.