थोडक्यात- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली
गेल्या दशकापासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी भीमांजलीच्या माध्यमातून शास्त्राrय संगीताच्या अलौकिक सुरांनी आदरांजली अर्पण केली जाते. यंदाही 6 डिसेंबरला सकाळी सहा वाजता रवीद्र नाटय़ मंदिरात भीमांजलीचा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रांतील हजारो लोकांचा समुदाय दरवर्षी 6 डिसेंबरच्या पहाटे सूर, राग आणि तालाच्या वैश्विक भाषेतून संविधानकार डॉ. बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येतो. यंदा उस्ताद सुजात हुसेन खान (सतार), पंडित राजेंद्र प्रसन्ना (बासरी), पंडित अतुल कुमार उपाध्याय (गायन), पंडित मुकेश जाधव (तबला), पंडित श्रीधर पार्थसारथी (मृदंगम) हे कलावंत भीमांजलीच्या माध्यमातून महामानवाला आदरांजली वाहणार आहेत, असे डॉ. विजय कदम यांनी सांगितले.
माहीम येथे दत्त जयंती उत्सव
सालाबादप्रमाणे यंदाही दत्तजयंतीचा उत्सव सद्गुरू राऊळ महाराज चौक, कोकण नगर सोसायटी, डी/36, माहीम येथे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दत्त पादुका पूजन, अभिषेक, आरती आणि महाप्रसाद, प्रणव धारगळकर आणि मंडळी यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम, वंदना टिळक यांचे दत्त आख्यान होईल. पुरुषोत्तम पावसकर दत्त पाळणा गीत गातील. भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सद्गुरू सेवक उदय बांदिवडेकर यांनी केले आहे.
तेजस्विनी चव्हाण यांना युवा सांस्कृतिक पुरस्कार
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य युवा सांस्कृतिक पुरस्कारासाठी प्रसिद्ध भरतनाटय़म शिक्षिका व लोककला अभ्यासक तेजस्विनी चव्हाण-आचरेकर यांची निवड झाली आहे. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्माचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तेजस्विनी या गेली अनेक वर्षे भरतनाटय़मचे प्रशिक्षण, संशोधन आणि नृत्य संवर्धनासाठी कार्यरत आहेत.
मृणालताई नाटय़ करंडक स्पर्धा
सुदेश सावंत यांच्या सोहम थिएटर संस्थेच्या वतीने आयोजित ‘मृणालताई नाटय़ करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आठवे वर्ष यंदा उत्साहात साजरे होत आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी 12, 13 आणि 14 डिसेंबर रोजी केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे तर अंतिम फेरी 19 डिसेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली येथे रंगणार आहे. राज्यातील विविध नाटय़संघ, महाविद्यालयीन संघ आणि स्वतंत्र नाटय़गट या स्पर्धेत सहभागी होणार असून, नवोदित नाटय़कलावंतांना आपली कलात्मक अभिव्यक्ती सादर करण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील नाटय़ संस्कृतीला चालना देणे, तरुण कलावंतांना प्रोत्साहन देणे आणि नाटय़कलेबद्दलचा अभिमान वृद्धिंगत करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. संपर्क ः 9821355264/ 8779904193.
Comments are closed.