2025 आशिया कपमध्ये न भारत जिंकणार, न पाकिस्तान! माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मोठा दावा

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना 9 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि हाँगकाँग चीन यांच्यात खेळला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध होईल. मात्र या आशिया कप स्पर्धेत चाहत्यांना खरंतर भारत–पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची प्रतीक्षा आहे. हा सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईत खेळला जाईल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत–पाकिस्तान यांच्यात होणारा हा पहिला क्रिकेट सामना असणार आहे. या आशिया कपमध्ये 8 संघ खेळत आहेत आणि कोण विजेता होणार, यावर चर्चेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली (Basit Ali) यांनी वेगळं विधान केलं आहे. त्याचं म्हणणं आहे की, हा आशिया कप न भारत जिंकणार, न पाकिस्तान जिंकणार.

या वेळी आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. बासित अली म्हणाले की, जगभर खेळल्या जाणाऱ्या फ्रँचायझी लीगमध्ये क्रिकेट हा दुसऱ्या क्रमांकावर असतो, पहिल्या क्रमांकावर असतात व्यावसायिक हितसंबंध. आशिया कपमध्येही तसंच होणार आहे. न पाकिस्तान जिंकणार, न भारत जिंकणार आणि न श्रीलंका जिंकणार. हा कप जिंकणार ते म्हणजे ब्रॉडकास्टर्स. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, निर्णय प्रत्यक्ष मैदानावर खेळाडू घेत नाहीत, तर प्रसारकच अंतिम निर्णय घेतात.

या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे ग्रुप स्टेजमध्येच दोन्ही संघांची पहिली भिडंत होणार आहे. जर ग्रुप–A मध्ये यूएई आणि ओमान यांना मागे टाकून भारत–पाकिस्तान सुपर–4 मध्ये पोहोचले, तर पुन्हा एकदा सामना होईल. इतकंच नव्हे तर, जर दोन्ही संघ फायनलमध्येही पोहोचले तर तिसऱ्यांदा भारत–पाकिस्तान समोरासमोर येऊ शकतात.

Comments are closed.