MI vs CSK: कोण पटकावणार 6वे विजेतेपद? IPL इतिहासात दोन्ही संघ 5 वेळा चॅम्पियन!
यंदाच्या 18व्या आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. त्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या दोन बलाढ्य संघांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून वर्चस्व गाजवले. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात मुंबई आणि चेन्नईने आपल्या उत्कृष्ट खेळाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले, तर चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये ट्रॉफी जिंकली. या दोन्ही संघांनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने आणि उत्कृष्ट रणनीतीने आयपीएलमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.
मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये पराभूत केलेले संघ-
मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 23 धावांनी पराभव केला, 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 41 धावांनी पराभव केला, 2017 मध्ये त्यांनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा 1 धावेने पराभव केला, 2019 मध्ये पुन्हा चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 1 धावेने पराभव केला आणि 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला.
चेन्नई सुपर किंग्जने फायनलमध्ये पराभूत केलेले संघ-
चेन्नई सुपर किंग्जने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सचा (MI) 22 धावांनी पराभव केला, 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा (RCB) 58 धावांनी पराभव केला, 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला, 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव केला आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक आणि चुरशीचे असतात. दोन्ही संघांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने आयपीएलला एक वेगळी ओळख दिली आहे. या दोन संघांच्या चाहत्यांमध्येही नेहमीच गरमागरीचे वातावरण असते. आता आयपीएल 2025 मध्ये हे दोन्ही संघ सहाव्या विजेतेपदासाठी झुंजताना दिसतील.
Comments are closed.