मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील घटना, डॉक्टरच नसल्याने उपचाराअभावी नवजात बालकाचा मृत्यू

डॉक्टरच हजर नसल्याने उपचाराअभावी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात घडली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत आदिवासी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

खोडाळा येथे राहणाऱ्या वैशाली बात्रे या महिलेला प्रसूतीसाठी बुधवारी सकाळी 10 वाजता मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. रात्री 10च्या सुमारास तिची प्रसूती होऊन गोंडस बाळाचा जन्म झाला. मात्र 12 तासांत जी काळजी घेणे आवश्यक होते ती घेतली गेली नाही. प्रसूती दरम्यान ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच हजर नव्हते. फक्त एक परिचारिका होती. बाळाला केवळ दोनच नाळ होत्या. त्याची वारही सुस्थितीत नव्हती. सोनोग्राफीत हा प्रकार दिसून आला.

अशी झाली फरफट

बालकाच्या जन्मानंतर तज्ञ डॉक्टराचा सल्ला मिळाला नाही. योग्य ते उपचारही तातडीने न झाल्याने बाळ दगावले. त्यानंतरही आईला मोठय़ा रुग्णालयात पाठवण्याऐवजी खोडाळा प्राथमिक पेंद्रात दाखल करण्यात  आले. डॉक्टर नसल्यामुळे उपचाराअभावी आम्हाला बाळ गमवावे लागल्याचा आरोप अशोक बात्रे यांनी केला आहे.

बाळाची त्वचा पिवळसर

बाळाला तीन नाळ असणे अपेक्षीत असते. वारही सुस्थितीत असावी लागते अन्यथा प्रसूती दरम्यान बाळ दगावण्याची शक्यता असते, असे मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भारतकुमार महाले म्हणाले. बात्रे यांच्या बाळाची त्वचा पिवळसर असल्याने ते दगावले असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Comments are closed.