कोकण रेल्वेमध्ये फुकटे प्रवाशी वाढले!

कोकण रेल्वे मार्गावरील गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली असून गेल्या सहा महिन्यांत 1 लाख 82 हजार 781 फुकट्या प्रवाशांना पकडले. फुकट्या प्रवाशांच्या घुसखोरीचा तिकीटधारक प्रवाशांना त्रास होत आहे. यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल घेत कोकण रेल्वे प्रशासनाने संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणीच्या मोहिमा वाढवल्या आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल 5,493 विशेष तिकीट तपासणी मोहिमा हाती घेण्यात आल्या. यादरम्यान 1 लाख 82 हजार 781 प्रवाशी विनातिकीट तसेच नियमबाह्य पद्धतीने प्रवास करताना आढळले. त्या सर्व प्रवाशांकडून प्रवास भाडे व दंडाच्या रुपात 12 कोटी 81 लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. सणासुदीच्या दिवसांत कोकण रेल्वे मार्गावरील नियमित तसेच विशेष गाडय़ांना प्रचंड गर्दी होते. त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने रेल्वेने ही विशेष मोहीम राबवली.

Comments are closed.