हिंदुस्थानचा रेकॉर्डब्रेक विजय! न्यूझीलंडवर चार गडी राखून मात; यशस्वीपणे सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग, सॅमसनच्या तुफानापुढे किवींचे लोटांगण

संजू सॅमसनची तुफानी सलामी आणि नमन धीरच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर हिंदुस्थानने न्यूझीलंडवर पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात चार गडी राखून दमदार विजय साकारला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात नमन धीरने षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हिंदुस्थानचा हा विजय रेकॉर्डब्रेक ठरला. कारण हिंदुस्थानने पहिल्यांदाच २२६ धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला. या विजयासह हिंदुस्थानच्या संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

हिंदुस्थानच्या फलंदाजांची धमाकेदार फटकेबाजी

न्यूझीलंडच्या २२६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी हिंदुस्थानी संघाला भक्कम सुरुवात करून दिली. संजू सॅमसनने ३३ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावांची शानदार खेळी केली, तर त्याचा साथीदार अभिषेक शर्माने अवघ्या १२ चेंडूंमध्ये २९ धावा (२ चौकार, ३ षटकार) केल्या. मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यरने २८ चेंडूंमध्ये ४२ धावा करून डाव सावरला. मात्र तिलक वर्मा (६) आणि इशान किशन (१) स्वस्तात बाद झाले.

नमन धीरची शानदार खेळी

सामन्याच्या शेवटच्या क्षणी नमन धीरने १५ चेंडूंमध्ये नाबाद ४२ धावा (५ चौकार, २ षटकार) केल्या आणि त्याला अक्षर पटेलने (१४ चेंडूंमध्ये २४ घावा) उत्तम साथ दिली. हिंदुस्थानी संघाने १९.४ षटकांत ६ विकेट्स गमावून २३० धावा केल्या आणि रोमांचक विजय साकारला. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.

‘जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही दिलेले योगदान तुम्हाला समाधान देते. या विजयात सर्वांकडूनच चांगले योगदान मिळाले आहे. दुसऱ्या डावात चेंडू जास्त स्विंग होत होता. कारण तेव्हा हवा जास्त होती. पण चेंडू नेमका कसा पडतोय आणि तो कुठे जातोय, हे पाहूनच मी जोरदार फटकेबाजी केली.’

संजू सॅमसन

न्यूझीलंडची दमदार फटकेबाजी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला टीम सायफर्ट आणि फिन एलन यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. सायफर्ट १७ चेंडूंमध्ये २४ धावा करून बाद झाला. एलनने पाच चौकार आणि दोन षटकारांसह ४५ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि बेवन जेकब्स यांनी सूत्रे हाती घेतली आणि अवघ्या ३२ चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची शानदार भागीदारी केली. जेकब्स १६ चेंडूंमध्ये तीन षटकारांसह ३१ धावा करून धावबाद झाला. फिलिप्सने दमदार फलंदाजी करत २७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४० चेंडूंचा सामना करत नाबाद ८२ धावा केल्या आणि त्यामुळेच न्यूझीलंडला २२५ धावांचा डोंगर उभारता आला.

हिंदुस्थानच्या गोलंदाजांची धुलाई

या सामन्यात हिंदुस्थानचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. हिंदुस्थानसाठी अर्शदीप सिंग, मयंक यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. पण सर्वच गोलंदाज खूप महागडे ठरले. चार वर्षांनंतर संघात परतलेल्या भुवनेश्वर कुमारने ४ षटकांत ४९ धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे त्याचे पुनरागमन त्याच्या लौकिकाला साजेसे झाले नाही. अर्शदीपने चार षटकांत ४५ धावा दिल्या. अक्षर पटेल सर्वात महागडा ठरला आणि ४ षटकांत त्याने ५१ धावा दिल्या. नितीश कुमार रेड्डीलाही धावा रोखता आल्या नाहीत. एकही बळी न घेता त्याने ४० धावा दिल्या.

‘जेव्हा २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करायचा असतो, तेव्हा तुम्हाला डावाची सुरुवात चांगली व्हावी लागते. या सामन्यात पहिल्या सहा षटकांमध्येच ८५ घावा आम्ही केल्या आणि तिथेच विजयाचा पाया रचला गेला. दोन्ही सलामीवीरांना चांगला अनुभव आहे. जेव्हा ते मोठी खेळी साकारतात तेव्हा संघाचा विजय निश्चित असतो.’

श्रेयस अय्यर

Comments are closed.