सुथारसमोर अफगाणी गार; पदार्पणातच मानवने पाहुण्यांच्या फलंदाजांना नाचवले, पाहुण्या अफगाणिस्तानसमोर फॉलोऑनचे संकट

शुभमन गिलच्या दिमाखदार शतकानंतर पदार्पणवीर मानव सुथारच्या फिरकीच्या माऱ्यासमोर अफगाणी फलंदाज गार पडले. या दुहेरी हल्ल्याच्या जोरावर हिंदुस्थानने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत सामन्यावर जवळपास एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पहिल्या डावात 8 बाद 564 धावांचा प्रचंड डोंगर उभारल्यानंतर हिंदुस्थानी गोलंदाजांनी अफगाणिस्तानची अवस्था 5 बाद 113 अशी करून टाकली. तब्बल 451 धावांची पिछाडी आणि हातात केवळ पाच विकेट्स असल्याने पाहुण्या संघावर फॉलोऑनचे संकट गडद झाले आहे.

दुरुस्ती करणारा पहिल्याच सामन्यात धडाका

564 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवातच डळमळीत झाली. पदार्पणवीर मानव सुथारने आपल्या पहिल्याच कसोटीत प्रभावी गोलंदाजी करत तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्याने रहमानुल्लाह गुरबाज (12), अब्दुल मलिक (16) आणि अफसर जझई (3) यांना माघारी धाडत अफगाणिस्तानच्या डावाचा कणा मोडला. दुसऱ्या टोकाला प्रसिध कृष्णाने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (20) आणि सेदिकुल्लाह अटल (17) यांना बाद करत दबाव अधिक वाढवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रहमत शहा 43 धावांवर झुंज देत होता, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने फारशी साथ मिळालेली नव्हती.

अफगाणिस्तानसमोर अस्तित्वाची लढाई

दोन दिवसांच्या खेळानंतर सामना पूर्णपणे हिंदुस्थानच्या मुठीत गेला आहे. अफगाणिस्तान अजूनही 451 धावांनी मागे असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना मोठी झुंज द्यावी लागणार आहे. गिलच्या शतकाने उभारलेला धावांचा डोंगर आणि सुथार-प्रसिधच्या भेदक माऱ्यामुळे पाहुण्या संघासमोर आता अस्तित्व टिकवण्याचेच मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अफगाण गोलंदाज झाले अप्रभावी

पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावांवरून पुढे खेळणाऱ्या हिंदुस्थानने दुसऱ्या दिवशीही धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 169 धावांची दमदार भागीदारी रचत अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा पूर्णपणे समाचार घेतला. पहिल्या दिवसअखेर 103 धावांवर नाबाद असलेल्या गिलने आणखी 23 धावा जोडत 126 धावांची शानदार खेळी साकारली. दुसऱ्या बाजूला पंतने नेहमीच्या आक्रमक शैलीत 81 धावांची खेळी करत अफगाण गोलंदाजांची परीक्षा घेतली.

सर्वांनीच लावला हातभार

हिंदुस्थानी फलंदाजीची ताकद यावेळी प्रत्येक फलंदाजाने दाखवून दिली. सलामीवीर के. एल. राहुलने संयमी 100 धावांची खेळी केली, तर साई सुदर्शननेही 81 धावांचे बहुमोल योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर 52 धावांवर नाबाद राहिला. पदार्पणवीर मानव सुथारनेही 28 धावांची उपयुक्त खेळी केली. यशस्वी जैस्वाल (24), ध्रुव जुरेल (19) आणि मोहम्मद सिराजने अवघ्या 12 चेंडूंत 22 धावांची फटकेबाजी करत धावसंख्येला आणखी धार दिली. अफगाणिस्तानकडून मोहम्मद सलीम सफीने 6 विकेट घेत काहीसा प्रतिकार केला,

'स्थानिक बाय' गिलसाठी स्टेडियम पॅक

न्यू चंदिगडच्या मैदानावर स्थानिक चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. पंजाबचा लाडका आणि ‘लोकल बॉय’ शुभमन गिल फलंदाजीला येताच स्टेडियममध्ये जल्लोष उसळला. त्याच्या प्रत्येक चौकार-षटकारावर प्रेक्षकांनी आनंदोत्सव साजरा केला, मात्र गिल 126 धावांवर बाद होताच मैदानात काही क्षणांसाठी शांतता पसरली. स्थानिक चाहत्यांना आपल्या हीरोकडून आणखी मोठय़ा खेळीची अपेक्षा होती.

Comments are closed.