IND Vs AFG Test – मोहम्मद सलीमचा ‘सिक्सर अन् पदार्पणातच मानव सुथारची दिमाखात सुरुवात; टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड
हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानने 8 फलंदाज गमावत 546 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. हिंदुस्थानकडून शुभमन गिलने 126 तर के.एल. राहुलने 100 धावांची शतकी खेळी केली. याशिवाय बी. साई सुदर्शन आणि 50 वी कसोटी खेळणाऱ्या रिषभ पंतने प्रत्येकी 81 धावांचे योगदान दिले. दिवसअखेर अफगाणिस्तानने पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या असून ते अजूनही हिंदुस्थानपेक्षा 451 धावांनी मागे आहेत. अफगाणिस्तानकडून सध्या रहमत शाह 43 धावांवर खेळत आहे.
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सलीमने 140 धावा देत टीम इंडियाचे सहा गडी तंबुत धाडले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने शतकी खेळी करणाऱ्या शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलला बाद करून टीम इंडियाला झटके दिले. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 52 धावांची खेळी करत हिंदुस्थानला साडेपाचशे पार पोहोचवले. सकाळच्या सत्रात अझमतुल्ला ओमरझाईने अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु अफगाणिस्तानने डीआरएस (DRS) न घेतल्यामुळे गिल आणि पंत यांना जीवदान मिळाले, ज्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.
हवा फक्त वैभव सूर्यवंशीचीच! परदेशातही जोरदार चर्चा, इंग्लंडच्या वृत्तपत्रांमध्ये झळकला; पाहा Video
दुसऱ्या दिवसाचा खरा हिरो ठरला तो हिंदुस्थानचा पदार्पण करणारा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार. टीम इंडियाने डाव घोषित केल्यानंतर सुथारने चहापानापूर्वी आणि दिवसाचा खेळ संपण्याच्या अगदी शेवटच्या चेंडूवर बळी घेत अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. त्याने 21 धावांत 3 बळी घेत आपल्या कसोटी कारकिर्दीची दिमाखात सुरुवात केली. त्याला प्रसिद्ध कृष्णा (2 विकेट्स) आणि कुलदीप यादव यांनी उत्तम साथ दिली. खेळपट्टीवर मिळणारा टर्न आणि ड्रिफ्टचा वापर करून सुथारने अब्दुल मलिक, रहमानुल्लाह गुरबाज आणि अफसर झाझाई यांना बाद करत टीम इंडियाचे वर्चस्व कायम राखले.
Comments are closed.