टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचं पहिल्या वनडेत नेमकं काय चुकलं? पराभव ‘या’ कारणामुळं


पर्थ: भारत  आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका आजपासून सुरु झाली आहे. पहिल्या वनडेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. पावसानं अनेकदा व्यत्यय आणल्यानं पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवरील मॅच डकवर्थ लुईस नियमाप्रमाण मॅच खेळवण्यात आली. पर्थ वनडे 26-26 ओव्हरची खेळवण्यात आली. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 बाद 136 धावा केल्या. मात्र, डकवर्थ लुईस नियमाप्रमाणं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियानं  29 बॉल शिल्लक ठेवत 7 विकेटनं मॅच जिंकली. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया आता 1-0 नं आघाडीवर आहे. वनडे मालिकेतील दुसरा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे.

Reasons of Team India Loss : भारताच्या पराभवाची कारणं?

भारताची टॉप ऑर्डर फेल

भारताची टॉप ऑर्डर आजच्या मॅचमध्ये गडगडली. भारतानं पहिल्या चार विकेट 50 धावांच्या आत गमावल्या. विराट कोहलीला खातं उघडता आलं नाही. तर रोहित शर्मा 8 धावा करुन बाद झाला. यानंतर शुभमन गिल 10 आणि श्रेयस अय्यर 11 धावा करुन बाद झाला. टॉप ऑर्डर अपयशी ठरल्यानं  त्याचा दबाव इतर फलंदाजांवर आला. के एल राहुलनं 38 धावा आणि अक्षर पटेल यानं 31 धावा केल्या. यामुळं भारताचा डाव थोडा सावरला. मात्र, भारत मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.

विराट कोहली आणि रोहित शर्मा अयशस्वी

224 दिवसानंतर भारताकडून खेळणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट  कोहलीला आज मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पर्थ वनडेपूर्वी दोघांनी नेटमध्ये सराव केला मात्र, या दोघांनी भारत अ संघाकडून काही सराव सामने खेळले असते तर टीमला फायदा झाला असता, असं बोललं जातंय. सरावाच्या अभावामुळं देखील भारतीय संघाला फटका बसला.

उसळत्या खेळपट्टीमुळं भारतीय फलंदाज हैराण

भारतीय फलंदाजांना वेग आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करताना अडचणी येात.  पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये देखील हे पाहायला मिळालं. मिशेल स्टार्क, नाथन एलिस आणि जोश हेजलवूड यांनी पर्थच्या खेळपट्टीचा फायदा घेत शॉर्ट गोलंदाजी केली. याचा त्याना फायदा झाला.

पावसाचा व्यत्यय

पहिल्या वनडेत वारंवार पावसानं व्यत्यय आणला. यामुळं देखील भारतीय फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागला. मॅच 50-50 ओव्हरची असती तर भारताच्या टीमनं त्यानुसार रणनीती पुढं नेली होती. ओव्हर्स कपात झाल्यानं भारताला रणनीती मध्ये बदल करावा लागला.  या मॅचमध्ये नाणेफेक देखील महत्त्वाचा घटक ठरला. शुभमन गिलनं कॅप्टन म्हणून सातवा टॉस गमावला आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या मॅचमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या टीमला फायदा होतो तो इथं देखील पाहायला मिळाला.

गोलंदाज देखील अपयशी

भारताची गोलंदाजी देखील अचूक झाली नाही. भारताला ट्रेविस हेडची लवकर विकेट मिळाली होती. मात्र, त्यानंतर गोलंदाजांना वर्चस्व मिळवता आलं नाही. मिशेल मार्श भारताला लगेचच मिळाली असती तर मॅचमध्ये भारताला वर्चस्व गाजवता आलं असतं. मात्र, तसं झालं नाही. जोश फिलीप आणि मॅथ्यू रेनशॉ यांनी मार्शला चांगली साथ दिली, यामुळं ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.