फक्त 1 विकेट अन् 143 धावा! स्टीव्ह स्मिथसमोर भारतीय गोलंदाज हतबल, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी: मेलबर्न कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथसमोर भारतीय गोलंदाज हतबल दिसत आहे. खेळाच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत कांगारू संघाने 7 गडी गमावून 454 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ 139 आणि मिचेल स्टार्क 15 धावा करून क्रीजवर आहे. अशाप्रकारे या सामन्यात टीम इंडिया खूपच मागे पडली आहे. जसप्रीत बुमराहने भारतासाठी चांगली गोलंदाजी केली पण मोहम्मद सिराज चांगलाच महागात पडला.

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?

दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सात गडी गमावून 454 धावा केल्या होत्या. आज ऑस्ट्रेलियाने सहा गडी गमावून 311 धावांनी पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 5.30 च्या धावगतीने 27 षटकांत 143 धावा केल्या. या काळात संघाला एकच धक्का बसला. पॅट कमिन्स 49 धावा करून आऊट झाला. कमिन्सने स्मिथसोबत सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. सध्या स्टीव्ह स्मिथ 139 धावांवर आणि मिचेल स्टार्क 15 धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये 43 धावांची भागीदारी झाली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे वर्चस्व राखले. सध्या तरी स्टीव्ह स्मिथसमोर भारतीय गोलंदाज हतबल दिसत आहे.

स्टीव्ह स्मिथने झळकावले कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक

यादरम्यान ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथने जबरदस्त शतक झळकावले. स्टीव्ह स्मिथ काल कर्णधार पॅट कमिन्ससह नाबाद होता आणि आज तो फलंदाजीला आला तेव्हा त्याला कोणतीही अडचण आली नाही. यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील 34 वे शतक पूर्ण केले. आता सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथने युनूस खान, ब्रायन लारा, सुनील गावसकर आणि महेला जयवर्धने यांसारख्या दिग्गजांची बरोबरी केली आहे.

टीम इंडियाला या सामन्यात पुनरागमन करायचे असेल तर पहिल्या डावात चांगली फलंदाजी करावी लागेल आणि जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील, जेणेकरून ऑस्ट्रेलियन संघ जास्त आघाडी घेऊ शकणार नाही.

हे ही वाचा –

IND vs AUS 4th Test : झुकेगा नहीं साला… स्टीव्ह स्मिथने ठोकले शामदार शतक, भारताविरुद्ध ‘ही’ अद्भुत कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

Ind vs Aus 4th Test : अखंड भारत शोकसागरात! मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने हातावर बांधली काळी पट्टी, मोठे कारण आले समोर

अधिक पाहा..

Comments are closed.