Ind vs Aus: सिरीज गमावल्यानंतर कर्णधार शुबमन गिलचे मोठे वक्तव्य, जाणून घ्या पराभवाचं खरं कारण
पर्थनंतर अॅडिलेडमध्येही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारताने मालिका गमावली आहे. भारतीय गोलंदाज 265 धावांचे लक्ष्य बचाव करण्यात अपयशी ठरले. कांगारू संघाने दुसरा वनडे 2 विकेटने जिंकला.
कर्णधार म्हणून शुबमन गिलने पहिलीच वनडे मालिका गमावली आहे. पराभवानंतर गिल संघाच्या फिल्डिंगवर विशेषतः नाराज दिसला. त्याने या पराभवासाठी फिल्डर्सना जबाबदार ठरवले. त्याचबरोबर गिलने रोहित शर्माच्या खेळीचे कौतुकही केले.
दुसऱ्या वनडेत झालेल्या पराभवानंतर शुबमन गिल म्हणाला, “आपण फलकावर पुरेशा धावा केल्या होत्या. पण जेव्हा आपण हातात आलेल्या संधी गमावतो, तेव्हा अशा लक्ष्याचे संरक्षण करणे सोपे नसते. पहिल्या सामन्यात पावसामुळे टॉस खूप महत्त्वाचा ठरला होता. मात्र या सामन्यात टॉसची भूमिका काही विशेष नव्हती, कारण दोन्ही संघांनी जवळपास 50-50 षटके खेळली. सुरुवातीला विकेटवर थोडी हालचाल होती, पण 15 ते 20 षटकांनंतर खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल झाली होती.”
या सामन्यात भारतीय फिल्डिंग अतिशय साधारण दर्जाची होती आणि भारतीय खेळाडूंनी अनेक सोपे झेल सोडले, ज्याचा फटका संघाला बसला.
रोहित शर्माचे कौतुक करताना गिल म्हणाला, “इतक्या मोठ्या विश्रांतीनंतर परत येऊन स्पर्धात्मक क्रिकेट खेळणे अजिबात सोपे नसते. सुरुवातीला फलंदाजी करणे खूप आव्हानात्मक होते. पण रोहितने ज्या पद्धतीने खेळ केला, ते पाहून खूप छान वाटले. त्याने सुरुवातीला अप्रतिम झुंज दिली. माझ्या मते तो मोठी खेळी खेळण्यापासून थोडक्यात वंचित राहिला.”
रोहितने जबरदस्त फलंदाजी करत 97 चेंडूत 73 धावा केल्या. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याचबरोबर श्रेयस अय्यरनेही कठीण परिस्थितीत उत्कृष्ट खेळ करत 61 धावा झळकावल्या.
Comments are closed.