मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन घोषित, घातक खेळाडूचं पदार्पण

ऑस्ट्रेलियानं बॉक्सिंग डे कसोटीसाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं प्लेइंग 11 मध्ये दोन बदल केले. या दोन्ही बदलांची अपेक्षा आधीच होती. पिंक बॉल कसोटी खेळणारा स्कॉट बोलंड पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला असून एका फलंदाजाला कसोटी पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.

ब्रिस्बेन कसोटीत ट्रॅव्हिस हेडला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचं मेलबर्न कसोटीत खेळणं संशयाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. मात्र हेडनं ऑस्ट्रेलियाच्या सराव सत्रात भाग घेतला होता. त्यानं काही धावण्याच्या कवायती केल्या आणि काही काळ नेटमध्ये फलंदाजीही केली आणि आपला फिटनेस सिद्ध केला.

कांगारू कर्णधार पॅट कमिन्सनं स्पष्ट केलं की, हेड स्वत:ला तंदुरुस्त सिद्ध करण्यात यशस्वी ठरला असून तो कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल. कमिन्स म्हणाला, “हेड खेळण्यासाठी तयार आहे. त्यानं शेवटच्या क्षणी अडचणी दूर केल्या. त्याच्या दुखापतीबद्दल कोणतीही चिंता नाही आणि तो सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल.”

या सामन्याद्वारे 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी नॅथन मॅकस्विनीच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला. कॅनबेरा येथे प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाकडून खेळताना कॉन्स्टासनं भारताविरुद्धच्या दोन दिवसीय टूर सामन्यात जबरदस्त शतक झळकावलं होतं. कॉन्स्टासनं अवघ्या 97 चेंडूंत 14 चौकार आणि 1 षटकारासह 107 धावांची खेळी केली होती.

कॉन्स्टासनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रेड बॉल क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानं आतापर्यंत 11 सामन्यांच्या 18 डावांमध्ये 42.23 च्या सरासरीनं 718 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून दोन शतकं आणि तीन अर्धशतकं निघाली आहेत.

मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन – उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टन्स, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड

हेही वाचा –

सिराजला डच्चू! दोन फिरकीपटूंसह उतरणार टीम इंडिया? बॉक्सिंग डे कसोटीत अशी असेल भारताची प्लेइंग 11
भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांना 7 वर्षाच्या तुरुंगाची शिक्षा, काय आहे प्रकरण?
दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 115 धावांनी उडवला धुव्वा! 2-0 ने मालिका खिशात

Comments are closed.