INDvsAUS: ईडन गार्डन्सवर कसोटी सामना नाही, तरी दादा मात्र खूष; गांगुलीनेच दिले स्पष्टीकरण

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये आयपीएलचे वारे वाहू लागले आहे, तर बाकी देशांमध्येही टी२० लीग सुरू आहेत. यावरून टी२० क्रिकेट किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज येतो. अशा स्थितीतही काही चाहते कसोटी क्रिकेटला अधिक महत्व देतात. आयपीएल सुरू होण्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वरिष्ठ पुरूष संघाचे घरच्या मैदानावरील तिन्ही प्रकारच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचाही समावेश आहे. हे सामने ज्याठिकाणी आयोजित केले आहे, ते चकित करणारे आहे. यातील एकही सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनवर खेळला जाणार नाही, तरीसुद्धा बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) अध्यक्ष सौरभ गांगुली आनंदी आहेत, त्यामागचे कारण जाणून घेऊ.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच कसोटी सामन्यांची ही मालिका म्हणजेच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२७ मधील एकही सामना कोलकाता आणि मुंबई येथे खेळला जाणार नाही. हे सामने २१ जानेवारी ते २५ फेब्रुवारी यादरम्यान नागपूर, चेन्नई, गुवाहाटी, रांची आणि अहमदाबाद येथे खेळवले जाणार आहेत. यावरून एका कार्यक्रमावेळी गांगुली म्हणाले, “ईडन गार्डन्सवर मोठे कसोटी सामने खेळताना पाहणे ही एक आनंददायी बाब असते. सीएबीचा अध्यक्ष आणि माजी खेळाडू म्हणून येथे कसोटी सामने खेळले जावे, अशी माझी इच्छा आहे. आम्ही येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका कसोटी सामन्याचे आयोजन केले होते. त्यानंतर टी२० विश्वचषकाचे सामने खेळले गेले आणि आता आयपीएलचे सामने खेळले जात आहे.”

“आमच्या वेळी कसोटी सामने कोलकाता, कानपूर, चेन्नई आणि दिल्लीमध्ये होत. तेव्हा एक वेगळीच मजा असायची. ईडन गार्डन्सवर अधिक सामने व्हावे, असे वाटत असताना इतर मैदानांवरही सामने आयोजित केले पाहिजे हे पण समजून घेणेही आवश्यक आहे,” असेही गांगुली म्हणाले आहेत. यावरून गांगुलीने बीसीसीआयच्या रांची आणि गुवाहाटी येथे आयोजित केलेल्या कसोटी सामन्यांच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे.

गुवाहाटी नोव्हेंबर २०२५ पासून कसोटी केंद्र बनले आणि आता एका वर्षाच्या आत तेथे दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादमध्ये गेल्या ऑक्टोबरमध्ये एक कसोटी सामना खेळला गेला. तसेच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२४ मध्ये खेळला गेला. मुंबई आणि कोलकाता येथे कसोटी सामन्यांचे नियोजन नसले तरी तेथे झिम्बाब्वेविरुद्धचे वनडे सामने होणार आहेत. यामधील पहिला वनडे सामना ३ जानेवारीला कोलकातामध्ये आणि तिसरा वनडे सामना ९ जानेवारीला मुंबईमध्ये खेळला जाणार आहे.

Comments are closed.