IND vs AUS: पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11; गिलच्या नेतृत्वात रोहित-कोहलीचं पुनरागमन
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघात अनेक मोठ्या बदलांची नोंद घेण्यात आली असून, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघं जवळपास नऊ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत.
या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्माच्या जागी युवा फलंदाज शुबमन गिलला संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. त्यामुळे रोहित आणि कोहली आता गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत. गिलने गेल्या काही महिन्यांतील शानदार कामगिरीमुळे निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला उतरणार असून, यशस्वी जयस्वालला बाहेर बसावं लागू शकतं. गिल आणि रोहितची जोडी भारताला भक्कम सुरुवात करून देण्याची क्षमता ठेवते. रोहित शर्माने आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात (चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल) 76 धावा केल्या होत्या.
तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करेल. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर कोहलीची कामगिरी नेहमीच प्रभावी ठरली आहे. कोहलीने आतापर्यंत 302 एकदिवसीय सामन्यांत 14,181 धावा केल्या असून, त्याला संगकारा याला मागे टाकण्यासाठी केवळ 54 धावांची गरज आहे.
यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता असून, तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्यामुळे ध्रुव जुरेलला पहिल्या सामन्यात संधी मिळणं कठीण आहे.
फिरकी विभागात अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल आक्रमक फलंदाज म्हणूनही संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कुलदीप यादवने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत प्रभावी कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.
गोलंदाजी आघाडीत मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाज असतील. पर्थच्या खेळपट्टीवर वेग आणि उसळी असते, त्यामुळे सिराजचा मारा निर्णायक ठरू शकतो. हर्षित राणा याला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग 11 (1st ODI vs ऑस्ट्रेलिया):
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
पहिला ODI – 19 ऑक्टोबर: ऑप्टस स्टेडियम, पर्थ
दुसरा ODI – 23 ऑक्टोबर: अॅडलेड ओव्हल
तिसरा ODI – 25 ऑक्टोबर: सिडनी क्रिकेट ग्राउंड
Comments are closed.