युवा कसोटीच्या पहिल्याच दिवशी 17 फलंदाजांची विकेट; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 135 धावांवर गारद

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने दुसऱ्या युवा कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघावर पहिल्याच दिवशी 9 धावांची आघाडी घेतली आहे. मॅके येथे सुरू असलेल्या या चारदिवसीय हिंदुस्थानी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 43.3 षटकांत 135 धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानचीही उर्वरित 40 षटकांच्या खेळात 7 बाद 144 अशी अवस्था झाली, मात्र तरीही हिंदुस्थानला पहिल्या दिवशी 9 धावांची आघाडी मिळविण्यात यश आहे. दिवसभरात तब्बल 17 फलंदाज बाद झाले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हेनिल पटेल 22, तर दिपेश देवेंद्रन 6 धावांवर खेळत होते.
आठ फलंदाजांची एकेरी धाव
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे तब्बल आठ फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. त्यातील 3 फलंदाजांना भोपळाही पह्डता आला नाही. संघासाठी यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स ली यंगने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. त्याने 108 चेंडूंत 9 चौकारांसह एक षटकार ठोकला. याचबरोपर यश देशमुख (22) व विल मालाजुक (10) हे इतर दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ केवळ 135 धावांवर गारद झाला.
हेनिल, खिलनचे 3-3 विकेट
हिंदुस्थानकडून खिलन पटेल आणि हेनिल पटेल या पटेल बंधूंनी प्रत्येकी 3 फलंदाज बाद करीत कांगारूंची कत्तल केली. पदार्पणवीर डावखुरा वेगवान गोलंदाज उद्धव मोहनने आघाडीच्या फळीतील 2 फलंदाज बाद केल्यानंतर हेनिल व खिलन या जोडगोळीची जादू सुरू झाली. दीपेश द्रेवेंद्रनने अर्धशतकवीर अॅलेक्स ली यंग हा बहुमोल बळी टिपला, तर केसी बार्टन हा धावचीत झाला.
हिंदुस्थानी फलंदाजही अपयशी
ऑस्ट्रेलियाला स्वस्तात गुंडाळणाऱ्या हिंदुस्थानी संघाची सुरुवातही निराशाजनक झाली. धावफलकावर 17 धावा असताना सलामीवीर विहान मल्होत्रा 11 धावांवर बाद झाला. या धावसंख्येत एका धावेची भर पडताच कर्णधार आयुष म्हात्रेही 8 धावांवर माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी (20), राहुल कुमार (9), वेदांत त्रिवेदी (25) व हरवंश पंगलिया (1) ही आघाडीची फळीही कोलमडली. त्यानंतर गोलंदाजीत चमकलेल्या खिलन पटेल (26) आणि हेनिल पटेल (22 धावांवर खेळत आहे) यांनी कांगारूंच्या गोलंदाजीचा काही वेळ प्रतिकार केला. आता दीपेश द्रेवेंद्रन 6 धावांवर हेनिलला साथ देत होता. ऑस्ट्रेलियाकडून केसी बार्टनने सर्वाधिक 3 गडी बाद केले. विल बायरोमला 2 विकेट मिळाल्या, तर चार्ल्स लॅचमुंड आणि जुलियन ऑस्बॉर्न यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.
हिंदुस्थानच्या युवा संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत आधीच 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतलेली आहे. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर डावाने व 57 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.
Comments are closed.