दीपेश देवदत्तचा कांगारूंना ‘पंच’, हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला 243 धावांवर रोखले

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या पहिल्या युवा कसोटी क्रिकेट सामन्यात दमदार सुरुवात केली. वेगवान गोलंदाज दीपेश देवदत्तच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया युवा संघाचा पहिला डाव 243 धावांतच गारद झाला.

तामीळनाडूच्या 17 वर्षीय दीपेश देवदत्त या गोलंदाजाने 5 विकेट टिपत ऑस्ट्रेलियाला गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला 30 धावांत दोन फलंदाज गमावले. दीपेश व किशन यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. ऑफस्पिनर अनमोलजित सिंगने कर्णधार विल मलाझुकला (21) माघारी धाडले. त्यामुळे पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाची 3 बाद 78 अशी दुर्दशा झाली. त्यानंतर खिलन पटेल व दीपेश यांनी हॉलिक आणि यष्टिरक्षक सायमन बज यांना बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 167 अशी झाली.

ऑस्ट्रेलियासाठी आघाडीच्या फळीतील स्टीव्हन होगनने 246 चेंडूंत 92 धावांची संयमी खेळी करत संघाला सावरण्याचे काम केले, मात्र इतर फलंदाज हिंदुस्थानी गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱयापुढे टिकू शकले नाहीत.  हॉलिकने 94 चेंडूंत 38 धावा करून दुसरे सर्वोच्च योगदान दिले. अखेर ऑस्ट्रेलिया युवा संघाचा डाव 91.2 षटकांत 243 धावांवर संपुष्टात आला.

हिंदुस्थान युवा संघाकडून दीपेश देवदत्तने 16.2 षटकांत केवळ 45 धावांच्या मोबदल्यात 5 फलंदाज टिपले, तर किशन कुमारनेही 16 षटकांत 48 धावा देत 3 गडी टिपत उत्तम साथ दिली. याचबरोबर अनमोलजित सिंग व खिलन पटेल यांनी 1-1 फलंदाज बाद केला.

यापूर्वी झालेल्या युवा एकदिवसीय मालिकेतही हिंदुस्थानने आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली 3-0 असे निर्भेळ यश मिळविले होते.  हिंदुस्थानने पहिला सामना 57 धावांनी, दुसरा 51 धावांनी आणि तिसरा 167 धावांनी जिंकला होता.

Comments are closed.