भारताने 247 धावा करत इतिहास रचला, इंग्लंडसोबत टी20 मध्ये असं पहिल्यांदाच घडलं

अभिषेक शर्माच्या (135) शानदार शतकामुळे भारताने आज (2 फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध पाचव्या टी20 सामन्यात मोठी धावसंख्या रचली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारताने निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 247 धावा करत एक नवा विक्रम रचला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने पॉवरप्लेमध्ये 95 धावा केल्या. हा टी20 फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर आहे. यासोबतच, इंग्लंडच्या विरुद्ध पहिल्यांदाच एखाद्या संघाने इतक्या मोठ्या धावा आणि षटकार झोडपले. भारताने सुरुवातीच्या 6 षटकांत केवळ संजू सॅमसनचा (16) विकेट गमावला होता.

आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्माने केवळ 54 चेंडूत 135 धावांची तुफानी खेळी साकारली, ज्यामध्ये 7 चौकार आणि 13 षटकारांचा समावेश होता. यासह, तो टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज ठरला. अभिषेकने केवळ 37 चेंडूत शतक झळकावत भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक ठोकले. क्रिजवर आल्यावर पहिल्याच चेंडूपासून चौकार-षटकारांची बरसात करत त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. हा 24 वर्षीय युवा फलंदाज भारतीय संघासाठी सर्वात जलद टी20 आंतरराष्ट्रीय शतक (35 चेंडू) झळकावण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत होता, मात्र तो अवघ्या दोन चेंडूंनी या विक्रमापासून दूर राहिला. त्याने केवळ 37 चेंडूत शतक पूर्ण केले, तसेच 17 चेंडूत अर्धशतक झळकावले, जे भारतीय फलंदाजांसाठी दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले.

भारताचा टी20 मध्ये सर्वाधिक पॉवरप्ले स्कोअर

95/1 विरुद्ध इंग्लंड वानखेडे 2025

82/2 विरुद्ध स्कॉटलंड दुबई 2021

बांगलादेश हैदराबाद विरुद्ध 82/1

78/2 विरुद्ध दक्षिण आफ्रिका जोबर्ग 2018

अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने टी20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. त्याने एका भारतीय फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला. 17व्या षटकात ब्रायडन कार्सच्या गोलंदाजीवर 11वा षटकार ठोकत त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला. अखेर त्याने 13 षटकार आणि 7 चौकारासह 135 धावा ठोकल्या. यामुळे अभिषेक टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम शुबमन गिलच्या नावावर होता. ज्याने 2023 मध्ये अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 126 धावा केल्या होत्या. अभिषेकच्या आक्रमक वृत्तीला इंग्लंडच्या गोलंदाजांकडे उत्तर नव्हते. अभिषेकने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर मनासारखी फटकेबाजी करत भरघोस धावा केल्या.

टीम इंडियाची टी20 मधील सर्वोच्च धावसंख्या

बांगलादेश विरुद्ध 297/6, हैदराबाद 2024

283/1 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोबर्ग 2024

260/5 विरुद्ध श्रीलंका इंदाैर 2017

247/9 विरुद्ध इंग्लंड वानखेडे 2025

हेही वाचा :
जाणून घ्या कोण आहे गोंगाडी त्रिशा? जी ठरली अंडर19 महिला टी20 वर्ल्डकपची सर्वोत्तम खेळाडू
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; योगासनमध्ये रुपेशला रूपेरी यश
IND vs ENG; अभिषेक शर्माचे झंझावाती शतक, भारताचे इंग्लंडसमोर 248 धावांचे आव्हान

Comments are closed.