पहिल्या कसोटीत साईची एन्ट्री, पाहा दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हन
इंग्लंड आणि भारत यांच्यातील हेडिंग्ले, लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी नाणेफेक झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून साई सुदर्शनला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. कर्णधार शुबमन गिलने स्पष्ट केले आहे की तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
टीम इंडिया चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली आहे. शार्दुल ठाकूरलाही अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज आहेत. करुण नायरलाही संधी मिळाली आहे. तो बऱ्याच काळानंतर कसोटी संघात परतला आहे.
पहिल्या कसोटीत नाणेफेक इंग्लंडच्या बाजूने गेल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावर भाष्य करताना त्याने सांगितले, “हेडिंग्लेची खेळपट्टी नेहमीच चांगली राहिली आहे. आम्ही इथे पूर्वी काही संस्मरणीय सामने खेळले आहेत. सुरुवातीच्या हवामानाचा फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला परत येण्यासाठी वेळ लागला, ही फक्त दुसरीच मालिका असली तरी आमचं तयारीवर पूर्ण लक्ष आहे. आमच्यातील काही खेळाडूंनी काउंटी क्रिकेटमध्ये भाग घेतला आहे आणि आम्ही तीन दिवस उत्तम सराव केला आहे.”
दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. पण सध्या सूर्यप्रकाश आहे आणि खेळपट्टी चांगली फलंदाजीसाठी अनुकूल दिसते. आम्ही बेकेनहॅममध्ये सराव सामना खेळला आणि आमचे खेळाडू चांगल्या लयीत आहेत. आज साई सुदर्शन आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात करतो आहे, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. करुण नायरचे पुनरागमनही आमच्यासाठी सकारात्मक आहे.”
इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन- जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर
भारताचा प्लेइंग इलेव्हन- यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा
Comments are closed.