IND vs END ODI – टीम इंडियाचा मालिकाविजय की इंग्लंडची बरोबरी!
नागपूरची मोहीम फत्ते केल्यानंतर हिंदुस्थानी संघ आता तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. कटक येथे रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानचेच पारडे जड मानले जात असल्याने हिंदुस्थान मालिका खिशात घालतो, की इंग्लंड मालिकेत बरोबरी साधतो, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. त्यातच क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आली असून, विराट कोहली उद्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
नागपूर येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत हिंदुस्थानने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. रविवारी कटक येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून टी-20 प्रमाणे एकदिवसीय मालिकादेखील खिशात घालण्याच्या इराद्याने हिंदुस्थान मैदानात उतरणार आहे. तर, इंग्लंडला उद्याच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान राखण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.
विराटचा जलवा दिसू शकतो!
गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे विराटला नागपूर येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात बाकावर बसून राहावे लागले होते. मात्र, विराट आता दुसऱ्या सामन्याआधी पूर्णपणे फिट झाला असल्याचे हिंदुस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी सांगितले. दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट हा सरावासाठी आला होता.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रविवारी (9 फेब्रुवारी 2025) कटकच्या बाराबती स्टडियमवर रंगणार आहे. सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्टेडियमवर सराव केला. यावेळी सराव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. #Indvseng #Viratkohli pic.twitter.com/cm91224805
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 8 फेब्रुवारी, 2025
कोणाची विकेट उडणार?
विराट फिट असल्याने त्याचे संघात पुनरागमन झाले, तर उद्याच्या सामन्यात कोणाची विकेट उडणार, हे पाहावे लागेल. पहिल्या सामन्यात विराटच्या अनुपस्थितीत अखेरच्या क्षणी श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले होते. श्रेयसने या संधीचा फायदा घेत पहिल्या सामन्यात 36 चेंडूंत 59 धावांची तुफानी खेळी करून हिंदुस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे उद्या विराट संघात परतला, तर कोण संघाबाहेर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.