क्रिकेटवारी – टॉस हरणं पथ्यावर पडलं!

>> संजय कऱ्हाडे

पाच कसोटी सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर मालिकेत पहिल्या सामन्याचा टॉस जिंकल्यावर बेन स्टोक्सची तंतरली! त्याने त्याच्या फलंदाजांवर भरवसा न ठेवता अँडरसन-ब्रॉडच्या निवृत्तीमुळे कमकुवत झालेल्या गोलंदाजांवर जबाबदारी टाकली अन् तो फसला. यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल आणि नवकप्तन शुभमन गिलने चित्त थाऱ्यावर ठेवत क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जॉश टंग, बेन स्टोक्स कंपनीवर आणि बशीरवर  ताव मारला. त्यांनी चौकारांची लडी लावली!

मीसुद्धा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचाच निर्णय घेतला असता, असं शुभमन गिल टॉसनंतर म्हणाला! स्टोक्सने त्याच्या फलंदाजांना बुमरापासून दूर ठेवलं असेल, पण गिल त्याच्या फलंदाजांना कोणापासून झाकत होता? असो, हा टॉस हरणं भारताच्या पथ्यावर पडलं. कप्तान म्हणून गिलला त्याच्या पहिल्या कसोटीत, पहिल्याच दिवशी पहिला धडा मिळाला.

अर्थात राहुलचे कव्हरमधले, जयस्वालचे ऑफ ड्राइव्हज आणि गिलचे फ्लिक्स केवळ रोमांचकारक होते. मात्र कार्सच्या ऑफ स्टंपबाहेर पुढे पडलेल्या चेंडूवर ड्राइव्ह करतानाच राहुलने श्वास सोडला! त्याच्यानंतर आलेला साई सुदर्शन पदार्पणाच्या कसोटीतच स्टोक्सने रचलेल्या लेग-स्टंप-ट्रपमध्ये अडकून यष्टिरक्षकाकडे झेल देऊन शून्यावर माघारी परतला. उपहाराला भारत 2 बाद 92!

उपहारानंतर चौथ्या क्रमांकावर जेवढय़ा दिमाखात शुभमन गिल मैदानावर उतरला होता त्यापेक्षा जास्त ऐटीत त्याने 56 चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कर्णधार पदाची जबाबदारी फलंदाजीवर परिणाम करत नाही असंच जणू त्याने सुचवलं. अर्थात कप्तान आहे म्हणून काळय़ा रंगाचे मोजे घालून इंग्लिश मैदानावर उतरलं तर टीकेची धनी व्हावं लागतं हेही त्याने विसरता कामा नये.

यशस्वीने मात्र फक्त 144 चेंडूंत शानदार शतक झळकावलं. त्यापूर्वी त्याच्या उजव्या हाताला मुंग्या आल्या होत्या, तरीही धावांचं वारूळ त्याने उभारलंच. त्याची डावरी फलंदाजी उजवी ठरली! कप्तान गिलच्या साथीने त्याने नाबाद शतकी भागीदारी नोंदवली.

इंग्लंडसाठी आजचा दिवस फारसा चांगला नव्हता. अर्थात ज्यो रूटने राहुलचा घेतलेला झेल त्याच्यासाठी 209वा ठरला. आता तो राहुल द्रविडच्या सर्वाधिक झेलांच्या (210) विक्रमाला गवसणी घालेल एवढं नक्की.

विभाजन नव्हे गिल, जयस्वॉल

आज कसोटीचा महत्त्वाचा टॉस जिंकणे हेच फक्त बेन स्टोक्सच्या पथ्यावर पडले. त्यानंतर पूर्ण दिवस हिंदुस्थानी छाव्यांनी गाजवले. यशस्वी जैसवाल आणि केएल राहुल या नव्या सलामीच्या जोडीने मने जिंकणारी 91 धावांची सलामी दिली. राहुलला (42) आपल्या खेळीला अर्धशतकी साज चढवता आला नाही. तसेच पदार्पणवीर साईचे सुदर्शनही शून्यावरच फसले. त्याचे पदार्पण दुर्दैवी ठरले. मात्र त्यानंतर यशस्वी आणि नवकर्णधार शुभमन गिलने इंग्लिश गोलंदाजांना पळवताना 129 धावांची खणखणीत भागी रचत पहिल्या दिवसावर हिंदुस्थानला वर्चस्व मिळवून दिले.

Comments are closed.