IND vs ENG: ओव्हलवर भारत कसा जिंकेल? रवि शास्त्रींनी दिला विजयाचा फॉर्म्युला

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून खेळवला जात आहे. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रापर्यंत फलंदाजी करत इंग्लंडपुढे 374 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सामना जिंकण्यासाठी भारताला चौथ्या दिवशी उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल. यावरच रवि शास्त्री यांनीही गौतम गंभीरला खास सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय गोलंदाज चौथ्या दिवशी कसे वर्चस्व गाजवू शकतात.

माजी भारतीय खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवि शास्त्री यांनी भारतीय गोलंदाजांना खास सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्या मते, गौतम गंभीरने आपल्या गोलंदाजांना इथे (पिचवर) आणलं पाहिजे आणि त्यांना त्या डेंट्स दाखवले पाहिजेत. तसंच ‘एक्स’ मार्कही दाखवले पाहिजेत. तिथे खूण करून सांगायला हवं की याच क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला माहीत आहे की 80% वेळ तुम्ही तिथेच गोलंदाजी करायची आहे. उरलेले काम पिच स्वतः करेल. लीड्सच्या तुलनेत, इथल्या पिचवर अधिक गवत आहे, त्यामुळे गोष्टी खूप जलद घडतील. इंग्लंडने लीड्समध्ये धावांचा पाठलाग केला होता. जर ते इथे जवळपास पोहोचले, तर मला वाटतं की त्यांनी लीड्समध्ये जे काम केले त्याच्या दुप्पट मेहनत केली असेल, कारण इथे ते सोपे नाही.”

शास्त्रींचे मत आहे की भारतीय गोलंदाजांनी पिचवर पडलेल्या डेंटवर अधिक लक्ष केंद्रित करायला पाहिजे. या भागातून चेंडू अधिक हालचाल करेल आणि इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागेल.

आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांपैकी भारतीय संघाने 1 सामना जिंकला आहे, तर इंग्लंडने 2 सामने आपल्या नावावर केले आहेत. मँचेस्टरमध्ये खेळलेला चौथा टेस्ट सामना मात्र अनिर्णीत राहिला होता. अशा परिस्थितीत टीम इंडिया सिरीजमध्ये 1-2 ने पिछाडीवर आहे. सिरीज 2-2 ने बरोबरीत आणण्यासाठी भारताला पाचवा सामना जिंकणं अत्यंत आवश्यक आहे.

Comments are closed.