गिलच्या युवा फौजेने इंग्लंडला झोडपलं! बर्मिंगहॅमवर भारताचा ऐतिहासिक विजय

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बर्मिंगहॅमच्या मैदानावर इतिहास रचत इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात 336 धावांनी दणदणीत पराभव दिला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. बर्मिंगहॅममध्ये भारताचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला आहे.

भारताने सामन्याच्या पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार शुबमन गिलने 269 धावांची भव्य खेळी केली. त्याला यशस्वी जायसवाल (87), रवींद्र जडेजा (89) आणि वॉशिंग्टन सुंदर (42) यांची साथ लाभली. तर इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

इंग्लंडचा पहिला डाव सुरूवातीला कोसळला होता. डकेट, पोप, रूट, क्रॉली लवकर माघारी परतले. मात्र त्यानंतर हैरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी शतक झळकावत सहाव्या विकेटसाठी 303 धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण मोहम्मद सिराजने 6 आणि आकाश दीपने 4 बळी घेत इंग्लंडचा डाव 407 धावांत गुंडाळला. परिणामी भारताला 180 धावांची आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावात भारताने पुन्हा वर्चस्व गाजवत 427 धावा करत डाव घोषित केला. गिलने दुसऱ्या डावातही 161 धावांची झंझावाती खेळी केली. त्याला केएल राहुल (55), रिषभ पंत (65) आणि जडेजा (69) यांनी साथ दिली. आशाप्रकारे इंग्लंडपुढे 608 धावांचे अवघड लक्ष्य ठेवण्यात आले.

इंग्लंडचा दुसरा डावही विशेष चालला नाही. आकाश दीपने शानदार गोलंदाजी करत 6 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा डाव 271 धावांत आटोपला. जेमी स्मिथने सर्वाधिक 88 धावा केल्या. भारताच्या विजयात मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जडेजा आणि सुंदर यांनी प्रत्येकी 1 बळी घेत मोलाची भूमिका बजावली.

या विजयासह शुबमन गिल बर्मिंगहॅममध्ये भारताला कसोटी विजय मिळवून देणारा पहिले कर्णधार ठरला आहे. गोलंदाजांची धार आणि फलंदाजांची झंझावाती कामगिरी यामुळे भारताने अशक्य वाटणारा विजय साकारला.

Comments are closed.