IND vs ENG: विक्रमवीर मोहम्मद सिराज! 'या' बाबतीत सचिन तेंडुलकर-हार्दिक पांड्याला टाकलं मागे

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025च्या शेवटच्या कसोटी सामन्यात, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, सिराजने आपल्या शानदार गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना खूप त्रास दिला. त्याने 4 विकेट्स घेत भारतीय संघाच्या पुनरागमनात महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात मोहम्मद सिराजने पहिली विकेट घेताच, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या. यासह, तो भारताकडून हा टप्पा गाठणारा 25वा क्रिकेटपटू बनला. सर्वात खास गोष्ट म्हणजे या काळात त्याने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि अष्टपैलू हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंनाही मागे टाकले.

इंग्लंडच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने 86 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णासोबत, त्याने इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर आणण्यात मोठी भूमिका बजावली. यासह, त्याने भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या बाबतीत सचिन आणि हार्दिकला मागे टाकले. सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 664 सामन्यांमध्ये 201 बळी घेतले आहेत, तर हार्दिक पांड्याने आतापर्यंत 202 बळी घेतले आहेत.

मोहम्मद सिराजच्या नावावर आता 203 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारा सिराज हा 14 वा वेगवान गोलंदाज आहे. 2017 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणाऱ्या सिराजने आतापर्यंत कसोटीत 117 बळी घेतले आहेत. त्याच वेळी, त्याने एकदिवसीय सामन्यात 71 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 14 बळी घेतले आहेत. मोहम्मद सिराजने सध्याच्या इंग्लंड दौऱ्यात चेंडूने चमकदार कामगिरी केली आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 मध्ये आतापर्यंत मालिकेत सर्वाधिक बळी घेत त्याने अव्वल विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणूनही स्थान मिळवले आहे. त्याने 18 बळी घेत इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकले आहे. इंग्लंड मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे

Comments are closed.