Ind Vs Eng – एक हिशेब आपल्या जखमांचा!

>> संजय खडे

युद्ध पार पडल्यानंतर जखमांचा हिशेब करायचा असतो असं म्हणतात! प्रामाणिकपणे विचार केला तर, हीच मालिका हिंदुस्थानच्या बखोटीत किमान 3-1 अशा तुर्रेबाज पद्धतीने बसायला हवी होती. म्हणूनच हिशेब मांडायचाय. नेहमीच दुर्लक्षित राहिलेली जखम म्हणजे क्षेत्ररक्षण नावाची डोकेदुखी. पहिल्या कसोटीत केवळ झेल सोडल्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला हे कुणीही मान्य करील. किंबहुना हीच जखम आपल्याला संपूर्ण मालिकेत सतावत राहिली.

दुसरी जखम होती ऋषभ पंत नावाची. ऋषभ प्रतिभावान अन् गुणी फलंदाज आहे, तो नैसर्गिकपणे खेळ करतो अशा शब्दांत त्याचा बचाव किंवा वर्णन किंवा काwतुक केलं जातं. पण त्याला थोडा कानमंत्र देणं आवश्यक आहे. ऋषभकडून अधिक परिपक्व खेळ अपेक्षित आहे. कसोटी क्रिकेटमध्ये काही शिष्टाचार पाळावे लागतात. जबाबदारीचं आणि सामन्याच्या परिस्थितीचं भान ठेवावं लागतं. त्याचं धावचीत होणं किंवा यॉर्परला उलटा स्पूप मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यामुळे संघाचं किती अन् कसं नुकसान झालं ते तर त्याला आता कळलंच असेल. कसोटी क्रिकेटमध्ये सरळ बॅट म्हणजे पांडुरंगाचे चरण. त्यांच्यावर डोकं ठेवलं तरच त्याच्यासाठी आवश्यक असणारा गुरू त्याला मिळू शकेल! कसोटीत आडवी बॅट, उलटा स्वीप, उलटा स्पूप इत्यादी वर्ज्य, पाप मानलं जातं!

शेवटची जखम अजित आगरकर आणि त्याच्या सहकाऱयांची. बुमरा जखमी आहे, पाच कसोटी खेळण्याऐवढा तंदुरुस्त नाही हे त्यांच्या ठावकी असतानाही त्यांनी बुमराला दौऱयासाठी निवडलं. त्यामुळे काय झालं. तो पहिली आणि तिसरी कसोटी ठरल्याप्रमाणे खेळला. दोन्ही सामने आपण हरलो! चौथी कसोटी खेळला, पण सामना अनिर्णित राहिला. मालिकेत बरोबरीची आवश्यकता असताना पाचव्या कसोटीत तो आधीच ठरल्याप्रमाणे खेळला नाही अन् हिंदुस्थानचा शानदार विजय झाला…

बुमरा अप्रतिम गोलंदाज आहे. पण संघात असला की आपण हरतो अन् नसला की जिंकतो अशी एक धारणा निर्माण झाली. तो देशासाठी नाही तर स्वतःच्या इच्छेप्रमाणे खेळतो असा भास निर्माण झाला. अशा अडचणीत टाकणाऱया किंवा लाजीरवाण्या परिस्थितीत त्याला आज अपराध्यासारखं उभं राहावं लागतंय ते फक्त निवड समितीमुळे. सर्व सामने खेळू शकणार नाही तर तुझी निवड करणार नाही, असं ठाम पाऊल उचलणं त्यांना जमलं नाही. किंवा त्यांच्यावर बोर्डाने दबाव टाकला असावा. कारण काहीही असो, कडुलिंबाची पानं मात्र चावावी लागताहेत ती जगातला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱया जसप्रीत बुमराला!

जेव्हा जेव्हा सिराजने आपल्या छाती फोडून केलेल्या कामगिरीसाठी ‘देशासाठी’चा हवाला दिला तेव्हा तेव्हा बुमराला टपल्या लागल्या असतील असंच मला वाटलं! असो. जखमा आणखीही आहेत. पण विजयोत्सवात त्यांच्यावर आता पडदा पडला असावा. त्या पडद्याखाली गौतम गंभीर लपणार का!

Comments are closed.