सिराजला कामगिरीचे संपूर्ण श्रेय मिळालेच नाही, सचिन तेंडुलकरकडून मॅचविनरला शाबासकी

संघाला जेव्हा जेव्हा गरज होती, तो संघासाठी उभा राहिलाय. ओव्हलवर हिंदुस्थानला थरारक मालिकेत लेव्हल मिळवून देण्याची किमयाही त्याने साधून दिली, पण मोहम्मद सिराजला अद्याप त्याच्या कामगिरीचे संपूर्ण श्रेय मिळालेले नाही, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सिराजला शाबासकी दिली आणि त्याच्या कामगिरीचे कौतुकही केले.

इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी सिराजने 104 धावांत 5 बळी घेत हिंदुस्थानला अवघ्या 6 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह पाच सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत संपली. निर्णायक क्षणी सिराजने केवळ 25 चेंडूंत 9 धावा देत तळाच्या तीन फलंदाजांना बाद करत इंग्लंडचा डाव उद्ध्वस्त केला. सिराजची ती कामगिरी निव्वळ अविश्वसनीय! सिराजचा दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे. मला त्याचा खेळावरचा दृष्टिकोन आणि उत्साह फार आवडतो. मालिकेत 1000 पेक्षा अधिक चेंडू टाकल्यानंतरही त्याने शेवटच्या दिवशीही त्याने जवळपास 145 किमी वेगाने चेंडू टाकत आपले धाडस दाखवले. या मालिकेत सिराजने एकूण 1113 चेंडू टाकून 32.43 च्या सरासरीने सर्वाधिक 23 बळी मिळवले. तो मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

दोन्ही विजय निव्वळ योगायोग

जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत मिळालेले विजय निव्वळ योगायोग आहेत. पण बुमरा हा अजूनही असाधारण आणि अविश्वसनीय गोलंदाज आहे. तो फक्त तीनच कसोटींमध्ये खेळला. सिराजने सर्वाधिक विकेट टिपले असले तरी बुमराची कामगिरी त्याच्यापेक्षा सरस आहे. बुमराने 48 कसोटींत 219, तर सिराजने 41 सामन्यांत 123 विकेट टिपले.

जाडेजा-सुंदरला शतकाचा अधिकार

चौथ्या कसोटीत इंग्लंडकडून ड्रॉची ऑफर आल्यावर हिंदुस्थानने सामना पुढे नेण्याचा निर्णय घेतला. यावरही सचिनने जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना शतक करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं स्पष्ट केलं. जर सामना ड्रॉ होणार हे माहीत असूनही फलंदाज खेळत आहेत, तर त्यांना शतक करू नये असं का म्हणावं? इंग्लंडने आधी दडपण टाकलं होतं. त्यानंतरही जर आमचे फलंदाज दिवसाअखेरीस फलंदाजी करत होते आणि शतकी खेळी करत होते, तर त्यात वाईट काय, अशी सचिनने जाडेजा-सुंदरच्या शतकांची पाठराखण केली.

स्टोक्सवर संताप

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या गोलंदाजांना विश्रांती देण्यासाठी सामना लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, यावर तेंडुलकरने तीव्र संताप व्यक्त केला. ‘गोलंदाजांना विश्रांती का द्यायची? इंग्लंडने हॅरी ब्रूक किंवा कोणालाही गोलंदाजी द्यावी हा त्यांचा निर्णय आहे. हिंदुस्थान त्याला जबाबदार नाही. पाचव्या कसोटीत इंग्लंडचे गोलंदाज ताजेतवाने का असावेत? याचं उत्तर कुणाकडे आहे का? माझयाकडे तरी नाही. मी संपूर्णपणे हिंदुस्थानी संघाच्या बाजूने आहे- मग तो गंभीर असो, शुभमन गिल, जाडेजा वा वॉशिंग्टन सुंदर – त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता.’

वॉशिंग्टन सुंदरच्या खेळाचं कौतुक

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीचेही सचिनने मनापासून काैतुक केले, जेव्हा तो खेळतो तेव्हा तो योगदान देतोच. दुसऱया कसोटीत पाचव्या दिवशी लंचपूर्वी त्याने बेन स्टोक्सला झेलबाद करत सामन्याचं चित्र पालटलं. त्या सामन्यातला तो क्षण ‘टार्ंनग पॉईंट’ होता. शेवटच्या कसोटीत त्याने झंझावाती शैलीत 53 धावा केल्या. चौथ्या कसोटीतही तो टिकून राहिला आणि ओव्हलवर वेगात धावा केल्या. ‘वेल डन वाशी’! मला त्याचा खेळ पाहून खूप आनंद झाला, अशा शब्दांत सचिनने त्याचीही पाठ थोपाटली.

Comments are closed.