INDvsENG: वानखेडे स्टेडियमवर पाऊस करणार खेळ खराब? मुंबईला यलो अलर्ट! जाणून घ्या हवामान रिपोर्ट

दोन वेळेचे टी२० चॅम्पियन भारत आणि इंग्लंड आज (५ मार्च) आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार असून सायंकाळी ७ वाजता सामना सुरू होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी उत्तम राहिली आहे. दोघांनी प्रत्येकी एक-एक सामना गमावला आहे. भारताला सुपर-८मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून आणि इंग्लंडला साखळी फेरीत वेस्ट इंडिजकडून पराभूत व्हावे लागले आहे. तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची दोघांमध्ये धडपड दिसणार आहे. यासाठी जाणून घेऊ मुंबईचे हवामान.
मुंबईची गरमी खेळाडूंना त्रास देण्याची शक्यता आहे. तेथे ३ मार्चपासून पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट सांगितला होता. अक्युवेदरनुसार मुंबईमध्ये खूप ऊन असल्याने तापमान ३९ डिग्री सेल्सियस असणार आहे. पावसाची शक्यता फारच कमी असून चाहत्यांना संपुर्ण सामना पाहता येणार आहे. सामन्यावेळी हवामान स्वच्छ असणार आहे आणि ते क्रिकेटसाठी अनुकूल आहे. ह्युमिडीटी अधिक असणार आहे. त्याचा त्रास वेगवान गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना होऊ शकतो.
सामन्यावेळी हवेला थोडा वेग असल्याने नव्या चेंडूने सुरूवात करणाऱ्या वेगवान गोलंदाजांना फायदा होणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोन्हीसाठी संतुलित आहे. यामुळे चाहत्यांना थरारक सामना पाहायला मिळणार आहे.
टी२० विश्वचषकात भारत आणि इंग्लंड तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत भिडणार आहेत. याआधी झालेल्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ असा विजय मिळवला आहे. इंग्लंडने २०२२मध्ये आणि भारताने २०२४मध्ये उपांत्य फेरीत सामना जिंकला होता. तसेच पुढे जाऊन दोघे विश्वविजेते ठरले होते. यामुळे आजचा सामना जिंकत तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचे दोन्ही संघांचे प्रयत्न असणार आहे.
भारताची संभाव्य इलेव्हन – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची संभाव्य इलेव्हन– फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (उजवीकडे), जेकब बेथेल, टॉम बंटन, सॅम कुरन, विल जॅक, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद.
Comments are closed.