टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय, मुंबई टी20 सामन्यात इंग्लंडचा सुपडासाफ!

IND vs ENG: भारताने टी20 मालिकेत इंग्लंडचा वाईटरित्या पराभव केला आहे. आज (02 फेब्रुवारी) रविवारी झालेल्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने 150 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिका 4-1 ने खिश्यात घातली आहे. अभिषेक शर्माने मुंबईत टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली. त्याने स्फोटक शतकाव्यतिरिक्त 2 विकेट्सही घेतल्या. या सामन्यात अभिषेकने अनेक विक्रम मोडले. शिवम दुबे देखील भारतासाठी महत्त्वाचा ठरला. इंग्लंडकडून फिलिप सॉल्टने अर्धशतक झळकावले.

पहिल्या डावात खेळताना भारताने 247 धावांचा डोंगर उभा केला. ज्यात अभिषेकने 135 धावांची खेळी खेळली. तर शिवम दुबेने 30 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ फक्त 97 धावांवर गारद झाला. वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली.

अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना धो धो धुतले, त्याने फक्त 54 चेंडूंचा सामना करत 135 धावा केल्या. अभिषेकच्या खेळीत 7 चौकार तर तब्बल 13 षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेने 13 चेंडूत 30 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. अशाप्रकारे, भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 247 धावा केल्या. सलामीवीर संजू सॅमसन 16 धावा करून बाद झाला. तिलक वर्मा 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमार यादवला फक्त 2 धावा करता आल्या.

भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. इंग्लंडचा संघ 10.3 षटकांत फक्त 97 धावांवर ऑलआउट झाला. यादरम्यान, फिलिप सॉल्टने अर्धशतक झळकावले. त्याने 23 चेंडूंचा सामना करत 55 धावा केल्या. तर जेकब बेथेल 10 धावा करून बाद झाला. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त, इतर कोणत्याही खेळाडूला दुहेरी अंकाचा टप्पा गाठता आला नाही.

गोलंदाजीत भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्तीने 2 विकेट घेतल्या. तर शिवम दुबेने देखील 2 षटकांत फक्त 11 धावा देत 2 बळी घेतले. सामन्यात विशेष म्हणजे अभिषेक शर्माने देखील गोलंदाजी केली. ज्यात त्याने 1 षटकात 3 धावा देऊन 2 बळी घेतले. हार्दिक पांड्याला एकही यश मिळाले नाही.

हेही वाचा-

भारताने 247 धावा करत इतिहास रचला, इंग्लंडसोबत टी20 मध्ये असं पहिल्यांदाच घडलं
IND vs ENG; अभिषेक शर्माचे झंझावाती शतक, भारताचे इंग्लंडसमोर 248 धावांचे आव्हान
जाणून घ्या कोण आहे गोंगाडी त्रिशा? जी ठरली अंडर19 महिला टी20 वर्ल्डकपची सर्वोत्तम खेळाडू

Comments are closed.