232 च्या स्ट्राईक रेटने 79 धावा केल्या, तरीही अभिषेक शर्मा नव्हे तर हा खेळाडू ठरला सामनावीर
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या टी20 सामन्यात इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने भारतासमोर विजयासाठी फक्त 133 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या युवा भारतीय संघाने 12.5 षटकांत 3 गडी गमावून सहज गाठली. अभिषेक शर्माने 34 चेंडूत 79 धावा करून भारताच्या धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु या डावानंतरही त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला नाही. पहिल्या टी20 मध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवणाऱ्या वरुण चक्रवर्तीला हा पुरस्कार मिळाला.
वरुण चक्रवर्तीने चार षटकांत फक्त 23 धावा देत 3 बळी घेतले. या दरम्यान त्याने इंग्लंडचा कर्णधार जाॅस बटलर तसेच धोकादायक हॅरी ब्रुक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना परतीचा रस्ता दाखवला. बटलरने इंग्लंडकडून सर्वाधिक 68 धावा केल्या.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ईडन गार्डन्सवर इंग्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांनी तीन षटकांतच फिल साल्ट आणि बेन डकेट दोन्ही सलामीवीर गमावले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार जाॅस बटलर व्यतिरिक्त, दुसरा कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही. बटलरने 44 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणताही इंग्लिश फलंदाज 20 धावांचा टप्पाही गाठू शकला नाही.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास भारताकडून वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
धावसंख्येचा पाठलाग करताना, भारताने संजू सॅमसन (26) आणि अभिषेक शर्मा यांच्या जोडीने शानदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनीही 4.2 षटकांत 41 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव खातेही उघडू शकला नाही. यानंतर अभिषेकला पाठिंबा देण्यासाठी तिलक वर्मा मैदानात आला, पण डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने एकट्याने सामना फिरवला. त्याने 232.35 च्या स्ट्राईक रेटने तुफानी खेळी खेळत 34 चेंडूत 79 धावा केल्या. ज्यामुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला.
हेही वाचा-
अभिषेक शर्मानं इतिहास रचला, 18 वर्ष जुना ‘गुरु’ युवराज सिंगचाच महान रेकाॅर्ड मोडला
IND vs ENG; अभिषेक शर्माचे तुफानी अर्धशतक! भारताने उडवला इंग्लंडचा धुव्वा
Comments are closed.