“सध्या त्याला पाणीच वाटू द्या”, भारताचे दिग्गज वैभव सूर्यवंशीच्या घाईच्या पदार्पणाशी असहमत!
वरिष्ठ भारतीय क्रिकेट पुरुष संघ सध्या आयर्लंड दौऱ्यात आहे. या दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेत युवा वैभव सूर्यवंशीची निवड झाली. त्याच्या पदार्पणाची सर्वांनाच प्रतीक्षा, मात्र त्याला शुक्रवारी (२६ जून) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात अंतिम अकरामध्ये जागा मिळाली नाही. त्याला स्थान न दिल्याबद्दल भारताच्या दिग्गजाने प्रतिक्रिया दिली आहे.
माजी क्रिकेटपटू आर अश्विनने आयर्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यात वैभवला अंतिम ११ मध्ये स्थान न दिल्याबद्दल वक्तव्य केले आहे. त्याच्या मते, भारतीय टी२० संघाच्या अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी वैभवला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. तसेच त्याने असेही म्हटले की, एखाद्या सलामीच्या फलंदाजाच्या खराब कामगिरीमुळे किंवा दुखापतीमुळेच वैभव पदार्पण करू शकतो. ड्रेसिंग रूममध्ये बसून आणि पाणी वाटप करूनही त्याला खूप काही शिकायला मिळेल.
अश्विनने हे वक्तव्य त्याच्या युट्युब चॅनेलवरील ‘ऐश की बात’ या कार्यक्रमात केले आहे. तो यामध्ये ज्येष्ठ पत्रकार विमल कुमार यांच्यासोबत चर्चा करत होता. त्यामध्ये अश्विनला, वैभवला संघात स्थान न मिळाल्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, “हा एक क्रिकेट संघ आहे. कोणताही संघ कोणत्याही व्यक्तीसाठी बनवला जात नाही आणि गौतम गंभीर म्हणाला त्याप्रमाणे, ‘आम्हाला संघ प्रथम, सुपरस्टार ही संस्कृती नको’ आहे.”
“कोणत्याही खेळाडूला भारतीय संघात स्थान त्याच्या गुणवत्तेवर मिळाले पाहिजे. वैयक्तिक चर्चा किंवा प्रसिद्धीच्या आधारावर नाही. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनीही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विनाकारण त्यांना कोणी विश्रांती का देईल? त्यांच्या जागी वैभवला खेळवणे योग्य नाही,” असे अश्विन पुढे म्हणाला.
“अनेकदा क्रिकेट संघांमध्ये बाहेर बसून सामना पाहण्याचेही महत्त्व आहे. त्याला बाहेर बसू द्या, संघाची सेवा करू द्या, त्याला पाणी वाटू द्या, त्यातूनही बरेच काही शिकायला मिळते. त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही”,असेही अश्विनने पुढे म्हटले आहे.
या मालिकेत भारताचा पुढील सामना २८ जूनला आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिला सामना गमावला असून ते ०-१ असे मागे आहेत.
Comments are closed.