टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम; नामीबियाच्या चारीमुंड्या चीत, आता पुढचा निशाणा पाकिस्तानवर!

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा २०२६ च्या टी-२० विश्वचषकात दमदार प्रवास सुरू आहे. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फलंदाज अपेक्षेप्रमाणे चमकू शकले नाहीत, परंतु नामिबियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ती उणीव भरून काढली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ग्रुप-अ सामन्यात भारताने तब्बल ९३ धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ गडी बाद २०९ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात नामिबियाचा डाव १८.२ षटकांत ११६ धावांत गुंडाळला गेला. आता भारताचा पुढचा सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
धावांचा पाठलाग करताना नामिबियाने चांगली सुरुवात केली, परंतु अर्शदीप सिंगने चौथ्या षटकात जॅन फ्रिलिंकला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने लॉरेन स्टीनकॅम्पला २९ धावांवर बाद केले. त्यानंतर नामिबियाची घसरण सुरू झाली. संघाने ९४ धावांत सहा फलंदाज गमावले होते. रुबेन ट्रम्पेलमन आणि झेन ग्रीन यांनी सातव्या विकेटसाठी १७ धावांची भागीदारी केली, परंतु जसप्रीत बुमराहने ती मोडली. भारताकडून वरुणने ३, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी २, तर बुमराह, शिवम दुबे आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
फलंदाजीत ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी सामन्याचा चेहरामोहरा बदलला. अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली, परंतु तो २२ धावांवर बाद झाला. ईशानने २४ चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. सूर्यकुमार यादव १२ धावांवर बाद झाला, तर तिलक वर्माने २५ धावा केल्या. शेवटी, हार्दिक पंड्याने २८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५२ धावांची आक्रमक खेळी केली. शिवम दुबेने २३ धावांचे योगदान दिले अशाप्रकारे, भारताला २०० धावांच्या पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली.
Comments are closed.