भारताचा तिसऱ्या वनडेत ‘या’ पाच कारणांमुळं पराभव, कसोटीनंतर न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावली

इंदूर: न्यूझीलंडनं भारतात पहिल्यांदा वनडे मालिकेत विजय मिळवला आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 41 धावांनी पराभव झाला आहे. विराट कोहली, डेरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी तिसऱ्या वनडेत शतक झळकावलं. न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 337 धावा केल्या होत्या. विराट कोहलीनं 124 धावांची खेळी केली मात्र तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही.

नितीश कुमार रेड्डी गोलंदाजीत अपयशी

टीम इंडिया हार्दिक पांड्यासारख्या ऑलराऊंडरच्या शोधात आहे. हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत नितीश कुमार रेड्डीला संधी देण्यात आली होती. इंदौरमध्ये त्यानं 8 ओव्हरमध्ये 53 धावा दिल्या. नितीश कुमार रेड्डीला एकही विकेट मिळाली नाही. डेरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली.

क्रिस्टियन क्लार्कची दमदार कामगिरी

न्यूझीलंडच्या क्रिस्टियन क्लार्कच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागला नाही. राजकोट आणि इंदौर येथील वनडेत त्यानं प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या वनडेत क्लाक्कनं विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि नितीश कुमार रेड्डीची विकेट घेतली.

अखेरच्या षटकांमध्ये खराब गोलंदाजी

ग्लेन फिलिप्स आणि डेरिल मिशेल यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला होता. भारताच्या गोलंदाजांनी अखेरच्या 10 ओव्हरमध्ये 99 धावा दिल्या. हर्षित राणानं देखील खूप धावा दिल्या. त्यानं 3 विकेट घेतल्या पण 10 ओव्हरमध्ये 84 धावा दिल्या.

फलंदाज अपयशी

भारताच्या फलंदाजांनी तिसऱ्या वनडेत विजयासाठी 338 धावा करायच्या होत्या. रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर तिघेही फ्लॉप ठरले. केएल राहुल देखील एक रन करुन बाद झाला. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत 71 धावांवर भारताच्या 4 विकेट घेतल्या. विराट कोहलीनं एकट्यानं भारताचा किल्ला लढवला मात्र तो अपयशी ठरला.

फिरकीपटू अपयशी

वनडे मालिकेवर वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा तीन सामन्यांमध्ये महागडे ठरले. गेल्या दोन मॅचमध्ये दोन्ही फिरकीपटू अपयशी ठरले होते. तिसऱ्या सामन्यात अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी द्यायला हवी होती. मात्र, इंदौर वनडे रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवनं 12 ओव्हर गोलंदाजी केली त्यांनी 89 धावा दिल्या.

दरम्यान, भारतानं गेल्या वर्षी न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर आता वनडे मालिका देखील गमावली आहे. वनडे मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपपूर्वी ही मालिका महत्त्वाची आहे. भारताचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.