IND vs NZ: अभिषेक शर्माच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा 48 धावांनी पराभव करत मालिकेत विजयी सुरुवात केली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना बुधवार, 21 जानेवारी रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि धावसंख्या २७ धावा होईपर्यंत संजू सॅमसन (१०) आणि इशान किशन (८) पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर अभिषेक शर्माने एक टोक सांभाळताना कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 99 धावांची तुफानी भागीदारी केली.

अभिषेक शर्माने केवळ 35 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह 84 धावांची स्फोटक खेळी खेळली. सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 32 धावा जोडल्या, तर हार्दिक पंड्याने 16 चेंडूत 25 धावांची उपयुक्त खेळी केली. शेवटी, रिंकू सिंगने 20 चेंडूत नाबाद 44 धावा करत भारताला 238 धावांपर्यंत मजल मारली.

न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि काइल जेमिसन यांनी 2-2, तर ईश सोधी, ख्रिश्चन क्लार्क आणि मिचेल सँटनर यांनी 1-1 बळी घेतला.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवातही अत्यंत खराब झाली. डेव्हॉन कॉनवे (0) आणि रचिन रवींद्र (1) स्वस्तात बाद झाले. यानंतर टीम रॉबिन्सन (20) आणि ग्लेन फिलिप्सने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.

ग्लेन फिलिप्सने शानदार फलंदाजी करत 40 चेंडूत 78 धावा केल्या आणि मार्क चॅपमन (39) सोबत चौथ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. मात्र, धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज बाद झाल्याने संघ दडपणाखाली आला. अखेरीस, डॅरिल मिशेल (28) आणि कर्णधार मिचेल सँटनर (20*) यांनी शेवटी काही धावा जोडल्या, परंतु न्यूझीलंडचा संपूर्ण संघ केवळ 190 धावांपर्यंतच पोहोचू शकला.

भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी 2-2 बळी घेतले, तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांना 1-1 यश मिळाले.

एकूणच, भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला आणि टी-20 मालिकेत 1-0 अशी विजयी सुरुवात केली.

Comments are closed.