टीम इंडियाचा फॉर्म्युला बदलणार नाही! कर्णधार सूर्यानं दिली पुष्टी; अभिषेकच्या यशामागचं गुपित उघड
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर बुधवारी झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 48 धावांनी पराभव करत दमदार सुरुवात केली. भारताने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून 238 धावांचा विशाल स्कोअर उभारला, तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 7 विकेट्सवर 190 धावांपर्यंतच मजल मारू शकला. हा भारताचा न्यूझीलंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोअर ठरला आहे.
भारतीय डावाची सुरुवात मात्र अडखळती झाली होती. पहिल्या तीन षटकांतच भारताने 27 धावांत दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. अशा दबावाच्या परिस्थितीत सलामीवीर अभिषेक शर्माने जबाबदारी घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमक फटकेबाजी केली. अभिषेकने अवघ्या 35 चेंडूंमध्ये 84 धावांची तुफानी खेळी साकारली, ज्यामध्ये पाच चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारताला मजबूत स्थितीत नेलं.
बराच काळ खराब फॉर्मशी झुंज देत असलेला सूर्यकुमार यादव या सामन्यात काहीसा लयीत दिसला. त्याने 22 चेंडूंमध्ये चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 32 धावांचं योगदान दिलं. सामन्यानंतर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादवने संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. “मोठा स्कोअर उभारल्यानंतर दव असतानाही तो यशस्वीपणे डिफेंड करणं ही आमच्यासाठी मोठी सकारात्मक बाब आहे. पॉवरप्लेमधील दबाव असूनही आमच्या फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली,” असं सूर्यानं सांगितलं.
भारतीय संघाची रचना कायम ठेवण्याबाबत सूर्यानं स्पष्ट भूमिका मांडली. “आठ फलंदाज आणि तीन स्ट्राइक गोलंदाज असा फॉर्म्युला सध्या संघासाठी फायदेशीर ठरत आहे. हे कॉम्बिनेशन आम्ही पुढेही कायम ठेवू,” असं त्यानं स्पष्ट केलं. आपल्या फलंदाजीबाबत तो म्हणाला, “मी गेल्या काही आठवड्यांपासून नेट्समध्ये सातत्याने चांगली तयारी केली आहे. आजची परिस्थिती माझ्यासाठी योग्य होती.”
युवा फलंदाज अभिषेक शर्माचं विशेष कौतुक करताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “अभिषेक केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देतो. तयारी, शिस्त आणि स्वतःला कसं सावरायचं, या सगळ्याचं त्याला फळ मिळत आहे.” अभिषेकला या सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
Comments are closed.