अभिषेक शर्माची बॅट चेक! इतका खेळला की किवींना राहावले गेले नाही, VIDEO व्हायरल

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रविवारी (२५ जानेवारी) मालिकेतील तिसरा टी२० सामना खेळला गेला. हा सामना भारताने सलामीवीर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नाबाद स्फोटक अर्धशतकी खेळीमुळे ८ विकेट्ने जिंकला. यामुळे भारत पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत ३-० असे विजयी आघाडीवर आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या या सामन्यात अभिषेकची तुफानी खेळी पाहून त्याची बॅट तपासण्यात आली.

भारतासमोर या सामन्यात १५४ धावांचे लक्ष्य होते. पहिली विकेट पडल्यानंतर अभिषेकने इशान किशनच्या साथीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्यानंतर त्याने सूर्यकुमारसोबत तिसऱ्या विकेटसाठी १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. यामध्ये अभिषेकने ३४०च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने २० चेंडूत नाबाद ६८ धावा (७ चौकार, ५ षटकार) आणि सूर्यकुमारने २६ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या होत्या. दोघांच्या या धमाकेदार खेळीमुळे भारताने हा सामना १० षटक आणि ८ विकेट्स शिल्लक राखत जिंकला.

भारताला सामना जिंकून दिल्यावर अभिषेक परतत असताना न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्याची बॅट हातात घेतली. तो कसा काय इतका आक्रमक खेळतो, असा प्रश्न किवी खेळाडूंना पडला असेल. न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवे, जकॉब डफी आणि मिचेल सॅंटनर यांनी अभिषेकजवळ जात बॅट तपासली.

कॉनवे आणि डफी यांनी तर हातात घेत शॉट्स लगावले. त्यानंतर त्यांनी बॅटचे हॅंडल तपासल्यावर अभिषेकला परत केली. त्यांच्या या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अभिषेकने या मालिकेतील पहिल्या सामन्यातही मोठी खेळी केली होती. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या त्या टी२० सामन्यात त्याने ३५ चेंडूत ८४ धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्याने ५ चौकार आणि ८ षटकार मारले होते. यामुळे भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २३९ धावसंख्येचे लक्ष्य ठेवले होते. हा सामना भारताने ४८ धावांनी जिंकला होता.

Comments are closed.