Ind Vs NZ Final: आव्हान किवींचं, लक्ष्य विजेतेपदाचं
भारत विरुद्ध न्यूझीलंड ICC T20 विश्वचषक अंतिम 2026: क्रिकेटचा मॉडर्न अवतार अर्थात टी-ट्वेन्टी विश्वचषकातील क्लायमॅक्स जवळ आलाय. सूर्यकुमारची टीम इंडिया (Team India) आणि मिचेल सँटनरची फायटर न्यूझीलंड टीम (Newzeland Team) या संघांमध्ये फायनलची ठिणगी पडणार आहे. अहमदाबादच्या मैदानात रविवारी विजेतेपदासाठी घनघोर लढाई अपेक्षित आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या दोन्ही संघांनी उपांत्य लढतीत कमाल करून दाखवलेली. स्पर्धेत सेमी फायनलपर्यंत एकही सामना न गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला (South Africa) किवींनी पहिल्या सेमी फायनलमध्ये अक्षरश: चिरडून टाकलं. सलामीवीर फिन अॅलनच्या वादळी शतकासमोर दक्षिण आफ्रिकेचा पालापाचोळा झाला. साहजिकच त्यांचा आत्मविश्वास उंचावलाय. तिकडे दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा घामटा काढला खरा. पण, दबावाच्या क्षणी खडूस गोलंदाजी आणि दक्ष क्षेत्ररक्षण यामुळे आपल्याला फायनलचं तिकीट मिळालं. असं असलं तरी हा इतिहास झालाय.
आता नवा दिवस. नवी सुरुवात. भारताचा विचार केल्यास सॅमसनसह जवळपास सर्वच फलंदाज बहरात आलेत. अपवाद अभिषेक शर्माचा. गेल्या काही इनिंगमधले त्याचे स्कोअर पाहा. ९,१०,५५,१५,०,०,०. स्फोटक फलंदाज अशी ओळख निर्माण झालेल्या अभिषेकच्या बॅटमधून स्फोट सोडाच, धावांचा गोळीबारही होत नाहीये. अगदी गेल्या मॅचमध्येही वानखेडेवर त्याने अकारण घाई करत नाहक विकेट गमावली. फायनलमध्ये धावांचा दुष्काळ संपवण्यासाठी तो प्रयत्नांची शिकस्त करेल, अशी अपेक्षा करुया. अर्थात किवींचा पेपर इंग्लंडच्या तुलनेत कठीण असणार हे नक्की. त्यातच भारतीय संघातल्या डावखुऱ्या फलंदाजांची संख्या पाहता न्यूझीलंड ऑफ स्पिनचं जाळं टाकेल हे नक्की.
कोल मॅकोंची आणि ग्लेन फिलिप्स असे दोन ऑफ स्पिनचे ऑप्शन्स त्यांच्याकडे आहेत. तर, फर्ग्युसन आणि हेन्रीच्या रुपात त्यांच्याकडे वेगवान अस्त्र आहेत, जी आखूड टप्प्याच्या चेंडूंनी भारताची परीक्षा घेऊ शकतात. अर्थात भारताचाही होमवर्क उत्तम झाला असणार हे नक्की.त्यामुळे हा सामना डावपेच, मानसिक कणखरता यांची कसोटी पाहणारा असेल. आपली गोलंदाजीतली मदार बुमरावर प्रामुख्याने असेल. हार्दिक, अर्शदीप त्याला साथ देतील. वरुण चक्रवर्तीची काहीशी ढासळलेली कामगिरी हा थोडा विचार करायला लावणारा विषय आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीवर ४७,३५,४०,६४ अशा धावा चोपून काढण्यात आल्यात. विकेट काढून देणारा भरवशाचा गोलंदाज अशी त्याची ओळख आहे. तरी सुपर एट फेरीपासून त्याचा घसरलेला फॉर्म थोडंसं टेन्शन देणारा आहे. त्यामुळे त्याच्या जागी कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर किंवा सिराजचा विचार होणार का, या उत्तरासाठी आपल्याला रविवारच्या टॉसपर्यंतची वाट पाहावी लागेल. या सामन्यात आणखी एक घटक निर्णायक ठरू शकेल. तो अर्थातच क्षेत्ररक्षण. न्यूझीलंडचं क्षेत्ररक्षण अतिशय दक्ष असतं, हे आपण वेळोवेळी पाहिलंय. गेल्या मॅचमध्ये अक्षर पटेलच्या फिल्डिंगनी डोळ्यांचं पारणं फिटलेलं. अक्षरच्या त्या क्षेत्ररक्षणाचा आदर्श समोर ठेवत आपल्या पूर्ण टीमनेच क्षेत्ररक्षणावेळी मैदानात झोकून द्यायला हवं. बचावलेली प्रत्येक धाव लाख मोलाची ठरणार आहे. त्याच वेळी पकडलेला प्रत्येक कॅच विजेतेपदाकडे टाकलेलं एकेक पाऊल ठरणार आहे.
आता अहमदाबादच्या मैदानाबद्दल थोडंसं. अहमदाबादच्या या स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची २०२३ च्या वनडे वर्ल्डकपची गमावलेली फायनल ही सल आपल्या मनात अजूनही आहे. आता अहमदाबादच्या त्याच मैदानात पुन्हा एकदा आपण विजेतेपदाची लढाई लढतोय. अर्थात यावेळी टी-ट्वेन्टी विश्वचषकासाठी. विंडिज भूमीवर बार्बाडोसच्या मैदानात २९ जून २०२४ ला अटीतटीच्या अंतिम फेरीत रोहितसेनेने बाजी मारलेली. त्या मॅचमध्ये बाऊंड्रीवर अफलातून कॅच पकडत ट्रॉफीपर्यंत आपले हात पोहोचवणारा सूर्यकुमार यादव आता कॅप्टनच्या भूमिकेत आहे. त्याच्यासह आपल्या टीमला आणि तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना हे विजेतेपद खुणावतंय. हे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय टीमला ऑल द बेस्ट.
Comments are closed.