IND vs NZ: तिसऱ्या टी20मध्ये ईशान किशान, अभिषेक शर्मा नाही तर ‘या’ खेळाडूने पटकावला सामनावीर पुरस्कार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवत सलग तिसरा विजय मिळवला आणि मालिका आधीच खिशात घातली. गुवाहाटी येथे झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडला अक्षरशः एकतर्फी पद्धतीने पराभूत करत टी20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 गडी बाद होऊन 153 धावा केल्या. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असतानाही न्यूझीलंडचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. यामागे भारतीय गोलंदाजांची शिस्तबद्ध आणि आक्रमक कामगिरी कारणीभूत ठरली. जसप्रीत बुमराहने आपल्या धारदार गोलंदाजीने किवी फलंदाजांची दाणादाण उडवली. बुमराहने 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव मोडून काढला. त्याला रवि बिश्नोईने चांगली साथ दिली. बिश्नोईने मधल्या फळीत अचूक मारा करत 2 विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पांड्या आणि हर्षित राणानेही सुरुवातीपासून दबाव निर्माण केला.
153 धावांचे आव्हान तसं पाहिलं तर भारतासाठी सोपं होतं, मात्र सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन बाद झाला. गोल्डन डकवर माघारी परतल्यामुळे संघावर क्षणभर दबाव निर्माण झाला. मात्र, ईशान किशनने मैदानात उतरताच आक्रमक भूमिका घेतली. पहिल्या षटकातच 16 धावा काढत त्याने भारताचा आत्मविश्वास वाढवला. ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 53 धावांची झटपट भागीदारी केली. ईशान 28 धावा करून बाद झाला, पण अभिषेक शर्मा थांबला नाही.
अभिषेक शर्माने केवळ 14 चेंडूत अर्धशतक ठोकत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादवची उत्तम साथ लाभली. सूर्यकुमार यादवनेही नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. भारताने अवघ्या 10 षटकांत 2 विकेट्स गमावत 154 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.
या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराहला ‘सामनावीर पुरस्कार’ देण्यात आला. त्याच्या भेदक स्पेलमुळेच न्यूझीलंडचा संघ 153 धावांवर रोखला गेला. या विजयासह भारताने मालिका 3-0 ने जिंकली असून उर्वरित दोन सामन्यांतही विजयी लय कायम ठेवण्याचा निर्धार टीम इंडियाचा आहे.
Comments are closed.