रिंकू सिंग द बेस्ट फिनिशर! शेवटच्या षटकातील स्ट्राईक रेट विरोधी संघांना धडकी भरवणारा
भारत विरुद्ध न्यूझीलंंड यांच्यात बुधवारी (२१ जानेवारी) पहिला टी२० सामना खेळला गेला. नागपूरमध्ये झालेल्या या सामन्यात भारत ४८ धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. सुरूवात अप्रतिम झाल्यावर भारताच्या फलंदाजीचा शेवटही तसाच चांगला झाला. रिंकू सिंगने पुन्हा एकदा ताबडतोब फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. त्याने त्याच्या कारकिर्दीतील सुमारे ३६ टक्के धावा १९व्या आणि २०व्या षटकात केल्या आहेत.
रिंकू भारतासाठी आतापर्यंत ३६ टी२० सामन्यातील २६ डावांमध्ये खेळला आहे. त्यामध्ये त्याने त्याने ४५.६९च्या सरासरीने ५९४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ५० चौकार आणि ३४ षटकार मारले असून त्याचा स्ट्राईक रेट १६५ एवढा राहिला आहे. यामधील त्याच्या १९ आणि २० व्या षटकातील फलंदाजी पाहिली तर त्याने भारतासाठी २८७.८३च्या स्ट्राईक रेटने २१३ धावा (७४ चेंडू) केल्या आहेत. यामध्ये त्याने १४ चौकार आणि २२ षटकार मारले आहेत.
रिंकूने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी२०तही त्याचा फॉर्म कायम राखला. त्याने डॅरिल मिचेलच्या २० व्या षटकात २१ धावा वसूल केल्या. यामध्ये त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. तसेच त्याचा टी२० विश्वचषक २०२६साठी भारताच्या संघात समावेश आहे. यामुळे त्याचा हा फॉर्म पाहता विरोधी संघांमध्ये त्याला बाद करण्यासाठी नक्कीच योजना आखली जात असेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने स्फोटक फलंदाजी अभिषेक शर्माच्या ८४ धावा (३५ चेंडू), कर्णधार सूर्यकुमार यादवच्या ३२ आणि रिंकूच्या नाबाद ४४ धावा (२० चेंडू) जोरावर २० षटकात ७ बाद २३८ धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात अडखळत झाली. त्यांनी पहिल्या दोन विकेट २ षटकातच गमावल्या नंतर ग्लेन फिलिप्सने उत्तम फलंदाजी केली. त्याने ४० चेंडूत ७८ धावा केल्या. त्याला मार्क चॅपमनने चांगली साथ दिली, मात्र या सामन्यात भारताचे पारडे जड ठरले.
या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार, २३ जानेवारीला रायपूर येथे खेळला जाणार आहे.
Comments are closed.