मिचेलच्या तुफानासमोर विराटही हतबल! सर्व विभागांमध्ये किवींनीच मारली बाजी
नुकतेच भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी एक सामना जिंकत १-१ असे बरोबरीत होते. त्यामुळे इंदौरचा तिसरा वनडे सामना दोन्ही संघाला मालिका विजयासाठी महत्वाचा होता. हा मालिका निर्णायक सामना रविवारी (१८ जानेवारी) खेळला गेला. होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पुन्हा एकदा भारताची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांना फलंदाजांनी चांगलेच धुतले. तरीही सामना संपल्यावर आकडेवारी पाहिली तर सर्व विभागांमध्ये भारत नाहीतर न्यूझीलंडचेच वर्चस्व राहिले आहे.
तिसरा सामन्यात भारतासमोर विजयासाठी ३३८ धावांचे लक्ष्य होते. फलंदाजी करताना भारताचे सलामीवीर आणि विराट कोहली वगळता मधली फळी पूर्णपणे ढासळली. भारताला तर पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाही. भारताने हा सामना ४१ धावांनी गमावला आणि मालिकाही. या सामन्यात एकूण तीन शतकी खेळी खेळल्या गेल्या. त्यातील एक शतक भारताचा स्टार फलंदाज विराटने आणि न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल-ग्लेन फिलिप्स यांनी शतकी खेळी केली.
विराटने या सामन्यात १२४ धावा केल्या असल्या तरीही तो या मालिकेत सर्वाधिक धावा करताना मिचेलपासून बराच लांब राहिला आहे. न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज मिचेलने या मालिकेत सलग दुसरे शतक ठोकले. तसेच त्याने पहिल्या सामन्यातही ८४ धावांची खेळी केली होती. यामुळे त्याने या मालिकेत १७६च्या सरासरीने तब्बल ३५२ धावा कुटल्या आहेत. त्याच्यानंतर विराट असून त्याने ८०च्या सरासरीने २४० धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर फिलिप्स असून त्याने १५० धावा केल्या आहेत.
गोलंदाजी विभागातही न्यूझीलंडच सरस ठरला आहे. त्यांचा नवखा वेगवान गोलंदाज क्रिस्टियन क्लार्कने ७ विकेट्स घेतल्या. त्यानंतर कायले जॅमिसन (६) आणि हर्षित राणा (६) यांचा क्रमांक लागतो. क्षेत्ररक्षणात दोन्ही संघ जवळपास सारखेच होते. दोन्ही संघातील काहींनी उत्तम झेल घेतले, तर काहींनी सोपे झेल सोडत महत्वाच्या संधी गमावल्या.
भारताची सलग दुसऱ्या वनडे सामन्यातील सुमार कामगिरी पाहता चाहते चांगलेच निराश झाले आहेत. या मालिकेत तर भारताचा सलामीवीर रोहित शर्माची बॅट शांंतच राहिली. त्याने या तिन्ही सामन्यात अनुक्रमे २६, २४ आणि ११ धावा केल्या होत्या.
Comments are closed.