INDvsNZ ODI: रोहितकडे इतिहास रचण्याची संधी, 'इतके' षटकार मारताच वर्ल्डरेकॉर्ड होईल नावावर

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना 14 जानेवारीला राजकोट येथे खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकत यजमान संघ 1-0 असा आघाडीवर आहे. वडोदरा येथे झालेला पहिला वनडे सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या सामन्यात रोहित शर्मा याला मोठी खेळी करता आली नसली तरी त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याने पहिल्या सामन्यात दोन षटकार आणि तीन चौकाराच्या सहाय्याने 29 चेंडूत 26 धावा केल्या. याच दोन षटकारामुळे तो वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर ठरला. आता त्याच्याकडे पुन्हा एकदा इतिहास रचत विश्वविक्रम नावावर करण्याची संधी आहे.

रोहितने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत तीन षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये SENA देश म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे करेल. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरेल. त्याचबरोबर त्याच्याकडे सलामीवीर फलंदाज म्हणून 16000 धावा करण्याची देखील संधी आहे. यासाठी त्याला केवळ 41 धावांची आवश्यकता आहे.

तसेच रोहितने राजकोटच्या सामन्यात शतक केले तर तो सर्वाधिक शतके मारणारा भारतीय सलामीवीर ठरेल. त्याचबरोबर रोहितकडे आशियामध्ये 6000 वनडे धावा पूर्ण करण्याची देखील संधी आहे. यासाठी त्याला केवळ 5 धावांची गरज आहे. तसेच त्याने या सामन्यात दोन षटकारदेखील मारले तरी तो न्यूझीलंडविरुद्ध वनडे प्रकारात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे करेल. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यांत आतापर्यत एकूण 49 षटकार मारले आहेत, तर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याच्या नावावर आहे. त्याने 50 षटकार मारले आहेत.

Comments are closed.