IND vs NZ: नववर्षाची सुरुवात मालिका विजयाने होणार का? भारताची प्रतिष्ठा वाचवणार का प्रिन्स?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सध्या रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. दोन सामने पूर्ण झाल्यानंतर ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असून, आता तिसरा आणि निर्णायक सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा आहे.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2026 मधील पहिल्याच एकदिवसीय मालिकेत दमदार सुरुवात केली होती. 11 जानेवारी रोजी बडोदा येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडने दिलेले 301 धावांचे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या सामन्यात ही लय कायम ठेवण्यात टीम इंडिया अपयशी ठरली.

राजकोट येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने जोरदार पुनरागमन करत भारताला पराभवाची चव चाखवली. विशेष म्हणजे, राजकोटच्या मैदानावर यशस्वी धावांचा पाठलाग करत सामना जिंकणारी न्यूझीलंड ही पहिलीच टीम ठरली. या विजयासह पाहुण्या संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आणि निर्णायक सामन्याची रंगत आणखी वाढवली.

आता तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडे मालिका जिंकण्याची समान संधी आहे. न्यूझीलंडसाठी भारत दौऱ्यावर कसोटीनंतर एकदिवसीय मालिकाही जिंकत 2026 ची दणक्यात सुरुवात करण्याची सुवर्णसंधी आहे. दुसरीकडे, यजमान भारतासाठी ही मालिका प्रतिष्ठेची बनली असून कर्णधार शुबमन गिलसमोर मालिका हातातून जाऊ न देण्याचे मोठे आव्हान आहे.

न्यूझीलंड संघाला भारतात आजवर एकदाही एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. विशेष बाब म्हणजे, या दौऱ्यावर न्यूझीलंडने आपली पूर्ण ताकदीची टीमही पाठवलेली नाही. असे असतानाही जर त्यांनी ही मालिका जिंकली, तर तो त्यांच्या इतिहासातील मोठा क्षण ठरेल. त्यामुळे भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना रविवारी, 18 जानेवारी रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार असून, क्रिकेट चाहत्यांना एका चुरशीच्या लढतीची अपेक्षा आहे.

Comments are closed.