गुरू युवराजकडून अभिषेकची मस्करी! म्हणाला, ‘अजूनही 12 चेंडूत 50 धावा काढू शकत…’

भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा त्याच्या वादळी खेळीने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात चर्चेत आला आहे. त्याने रविवारी (२५ जानेवारी) झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात त्याने ताबडतोब खेळी करताना भारताकडून टी२०मधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद अर्धशतक ठोकले. त्याच्या या खेळीची भारताचा माजी अष्टपैलू आणि त्याचा गुरू युवराज सिंग याने वेगळीच मजा घेतली आहे.

युवराजने सोशल मीडिया ‘एक्स’वर अभिषेकचा फोटो पोस्ट करत त्याला दिलेले कॅप्शन व्हायरल झाले आहे. त्यामध्ये त्याने अभिषेकला टॅग करत लिहिले, ‘अजूनही १२ चेंडूंमध्ये ५० धावा काढू शकत नाहीस, नाही का? खूप छान खेळलास. असाच दमदार खेळत राहा.’

गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अभिषेकने नेहमीप्रमाणे फलंदाजीला आक्रमक सुरूवात केली. त्याने १४ चेंडूत ५० धावा केल्या. तसेच त्याला सामन्यानंतर युवराजच्या विक्रमाबाबत विचारले असता तो म्हणाला, “युवी पाजींचा रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य आहे. मात्र क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. सध्या या मालिकेत सर्वच फलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत.”

“विक्रमे करणे माझ्यासाठी महत्वाचे नसून संघासाठी चांगली कामगिरी करण्यावर, विजय मिळवून देण्यावर लक्ष आहे. संघही माझ्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा करतो”, असेही अभिषेकने म्हटले होते.

या सामन्यात भारत १५४ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. यामध्ये अभिषेकने दुसऱ्या विकेटसाठी इशान किशनसोबत १९ चेंडूत ५३ धावांची आणि कर्णधार सुर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४० चेंडूत १०२ धावांची भागीदारी केली. त्याने या सामन्यात २० चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. त्यामध्ये त्याने एकही चेंडू निर्धाव न खेळता ७ चौकार आणि ५ षटकार मारले.

यावेळी सूर्यकुमारही २६ चेंडूत ५७ धावा करत नाबाद राहिला. दोघांच्या या अप्रतिम खेळीने भारताने १० षटकात २ विकेट्स गमावत सामना जिंकला. यामुळे भारत पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-० असा विजयी आघाडीवर आहे.

या मालिकेतील चौथा सामना २८ जानेवारीला विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. टी२० विश्वचषक २०२६ची पूर्वतयारी म्हणून ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. त्यातच अभिषेकचा फॉर्म यामुळे भारतीय चाहते नक्कीच खूष असतील.

Comments are closed.