VIDEO: गुवाहाटी टी20 मधील कुंग-फू पांड्याचा न्यूझीलंडविरुद्ध अफलातून झेल

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा टी२० सामना रविवारी (२५ जानेवारी) खेळला गेला. बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटीमध्ये झालेला हा सामना भारताने ८ विकेट्सने जिंकला. यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारत पाच सामन्यांच्या या मालिकेत ३-० असा विजयी आघाडीवर आहे. हा सामना भारताच्या गोलंदाज-फलंदाजांनी तर गाजवलाच, त्याचबरोबर सामन्याच्या सुरूवातीलाच स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने चपळ क्षेत्ररक्षण केले. त्याने घेतलेल्या त्या धमाकेदार कॅचचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हार्दिकने या सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेचा झेल घेतला. कॉनवे मोठा शॉट खेळण्याच्या नादात होता. तेव्हा चेंडू उंच गेला आणि कॉनवेला वाटले खेळाडू त्या सर्कलमध्ये असेल, मात्र हार्दिकचा दुसराच विचार होता. त्याने हवेत सूर मारत तो झेल पकडला. राणाच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर हे घडले. त्याच्या या अप्रतिम झेल घेतल्याचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर पोस्ट केला.

कॉनवे २ चेंडूत एक धाव करत बाद झाला. तो या दौऱ्यात पाचव्यांदा हर्षितचा शिकार ठरला. तसेच या सामन्यात हार्दिकने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्याने ३ षटकात २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याने डॅरिल मिचेल आणि रचिन रविंद्र यांना बाद केल्या. तसेच त्याने रविंद्रला या टी२० मालिकेत पाच चेंडू टाकताना दोनदा बाद करण्याचा विक्रम केला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनीही कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय योग्य ठरवला. न्यूझीलंडने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताने १० षटकात २ विकेट्स गमावत विजय मिळवला.

या मालिकेतील चौथा सामना २८ जानेवारीला विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे.

Comments are closed.