IND vs PAK: मोठी बातमी! वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही पाकिस्तान संघ, स्पर्धेतून माघार घेतली
पुरुष ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपला सुरुवात होण्यासाठी आता एक महिन्यापेक्षाही कमी वेळ उरला असताना, पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे होणार आहे. पाकिस्तानने या निर्णयाचे कारण म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या राजकीय तणावाचा उल्लेख केला आहे. पाकिस्तानचा समावेश गट ‘बी’ मध्ये भारत, चिली आणि स्वित्झर्लंडसोबत करण्यात आला होता. आता आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) ठरवेल की त्यांच्या जागी कोणता संघ सहभागी होईल.
‘टेलिकॉम एशिया स्पोर्ट’च्या अहवालानुसार, पाकिस्तान हॉकी महासंघाने (PHF) आपल्या सरकारशी चर्चा करून हा निर्णय घेतला आणि FIH ला अधिकृतरीत्या कळवले. त्यानंतर FIH हॉकी इंडियालाही या बाबत माहिती देणार आहे. हा भारतातील दुसरा असा हॉकी स्पर्धा आहे, जिथून पाकिस्तानने माघार घेतली आहे. यापूर्वी त्यांनी बिहारमधील राजगीर येथे झालेल्या एशिया कपमधूनही सहभाग नाकारला होता.
PHF चे सचिव राणा मुजाहिद यांनी सांगितले, “हो, सध्याच्या परिस्थिती अनुकूल नाहीत. नुकत्याच झालेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारतातील पाकिस्तानविरुद्ध भावना किती तीव्र आहेत, हे दिसून आले. खेळाडूंनी हस्तांदोलनही केले नाही आणि ट्रॉफीही घेतली नाही.”
PHF च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय पाकिस्तान सरकार आणि स्पोर्ट्स बोर्डच्या सल्ल्यानंतर घेतला गेला आहे. त्यांनी सांगितले की, सध्याच्या राजकीय तणावात भारतीय भूमीवर खेळाडूंना पाठवणे हे सुरक्षा दृष्ट्या धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संघाला न पाठवण्याचा निर्णय योग्य आणि सयुक्तिक असल्याचे त्यांचे मत आहे.
पाकिस्तानने यापूर्वीही ऑगस्ट महिन्यात आशिया कप हॉकी स्पर्धेतून माघार घेतली होती. त्या वेळी त्यांच्या जागी बांगलादेशचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तानला पुढील वर्षीच्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरता आले नाही.
पाकिस्तानच्या ज्युनियर संघाने अलीकडे मलेशियातील ‘सुल्तान ऑफ जोहोर कप’मध्ये भारताविरुद्ध सामना खेळला होता, जो 3-3 असा बरोबरीत संपला. दोन्ही संघांनी त्या वेळी सामन्यापूर्वी हाय-फाइव्ह केले होते. पाकिस्तानची ज्युनियर टीम गेल्या वर्षभरापासून वर्ल्ड कपची तयारी करत होती आणि तीन आंतरराष्ट्रीय मालिका खेळली होती, परंतु आता ती या मोठ्या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
Comments are closed.